संत्रानगरीतील पोलिसांचे हृदय तणावात
सामंजस्याने काढावा लागेल तोडगा
दिनांक :03-Oct-2026
Total Views |
अनिल फेकरीकरनागपूर
police under stress ‘उपर से टामटूम अंदर रामजाने’ अशीच काहीशी विदारक अवस्था संत्रानगरीतील कर्तव्यदक्ष पोलिसांची झाली आहे. कामाचा अधिक ताण, वरिष्ठांची असहकार्याची भूमिका यामुळे त्यांचे हृदयच तणावात आहे. अशीच अवस्था राहिल्यास ‘पोलिस कोमात आणि गुन्हेगार जोमात’ असेही चित्र भविष्यात उद्भवू शकते. यावर वेळीच उपाय न शोधल्यास गृह विभागासमोर गंभीर प्रश्न निर्माण होतील.
गणेश विसर्जन बंदोबस्त आटोपल्यावर घरी परतलेल्या सहायक फौजदार रवींद्र महादेवराव कोकाडे यांचा २७ सप्टेंबर २०२६ रोजी हृदयविकाराने मृत्यू झाला. वारंवार नाकाबंदी हाही प्रकार पोलिसांकरिता डोकेदुखी ठरला आहे. मनुष्यबळाची कमतरता, अधिकाऱ्यांचा दबाव पाहता कर्मचारी हतबल आहेत. वस्तुत: कर्मचाऱ्यांच्या बळावरच पोलिस खाते चालते. मग वरिष्ठ त्यांनाच टार्गेट करतात आणि कारवाईचा धाक दाखवितात.
नागपूर शहर पोलिसांचा इतिहास गौरवपूर्ण राहिला आहे. मग वर्तमान खराब का होत आहे, यावर त्रयस्थ म्हणून विचार करायची गरज आहे.
नागपूर शहरात एकूण ३७ पोलिस स्टेशन्स आहेत.\आज नागपूरची लोकसंख्या ३७ लाखांपेक्षा जास्त आहे. आयुक्तालयात सीपी, ज्वॉईंट सीपी, तीन ॲडिशनल सीपी, ११ डीसीपी, १४ एसीपींसह अंदाजे ८५०० कर्मचारी असून, त्यातील २ हजार पोलिस मुख्यालयात आहेत. याचा अर्थ केवळ ६५०० पोलिसांच्या बळावर कायदा व सुव्यवस्था राखली जात आहे. हे समीकरण पाहता एक लाख लोकसंख्येमागे केवळ १७६ पोलिस आहेत. हाच मनुष्यबळाचा आकडा जीवघेणा आहे. नाकाबंदी, राजकीय बंदोबस्त, मिरवणुका, मोर्चे, सर्व धर्मीयांचे विविध उत्सव यामुळे पोलिस यंत्रणा रात्रंदिवस राबत असल्याने शरीरासह मनाने थकली आहे. हा ताण पाहता त्यांना प्रोत्साहन देणारा अधिकारी हवा आहे. तशाच स्वरूपाचे कार्य यापूर्वी प्रवीण दीक्षित, डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केले आहे. त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करून गुन्हेगारीवर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण आणले होते. दरम्यान, ‘पीसी रस्त्यावर आणि सीपी वॉकीटॉकीवर’ असाही अभिनव प्रयोग प्रवीण दीक्षित यांनी राबविला होता. ते पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे. पण आता काम करणाऱ्यांवरच दबाव टाकला जातो. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळाचे सहकार्य गार्ड ड्यूटीसाठी घ्यावे. यामुळे पोलिसांवरील ताण कमी होऊ शकतो. एकंदरीत पाहता असलेल्या मनुष्यबळाचा विचारपूर्वक सुयोग्य वापर करण्याची वेळ आलेली आहे. याकरिता वरून सुरुवात करावी लागेल. तेव्हाच त्याची फळे प्रत्यक्ष मैदानात कार्यरत कर्मचाऱ्यांना मिळतील. अन्यथा संत्रानगरीतील पोलिसांचे हृदय तणावग्रस्तच राहील.
आजही ऑर्डरली कार्यरतपोलिस खात्यात वरिष्ठांकडे आजही टेलिफोन ऑपरेटरच्या नावाखाली ऑर्डरली कार्यरत आहेत. त्यांची संख्या जवळपास २०० आहे. अशा सर्वच कर्मचाऱ्यांची विविध ठाण्यांत नेमणूक करायला हवी. त्यातूनही थोडेफार मनुष्यबळ मिळेल.