जिल्ह्यासाठी विशेष दुष्काळ कृती आराखडा तयार करा: विजयराज शिंदे

जलसुरक्षेवर भर देण्याची महसूल मंत्र्यांकडे मागणी

    दिनांक :03-Oct-2026
Total Views |
बुलढाणा,
vijayraj-shinde जिल्ह्यातील सर्व १३ तालुके दुष्काळी उपाययोजनांच्या कक्षेत आले असून दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना तातडीचा दिलासा देण्यासोबतच भविष्यातील दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यासाठी स्वतंत्र विशेष दुष्काळ कृती आराखडा तयार करावा अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांना निवेदनाद्वारे केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यात दौरे करत आहे, या निमित्ताने भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी त्यांची भेट घेऊन शेतकर्‍यांवर आलेल्या समस्ये बाबत निवेदन सादर केले.
 
 
vijayraj-shinde
 
या निवेदनात शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीचे अचूक व पारदर्शक पंचनामे करून एकही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, तसेच दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली. सोबतच पीकविमा दावे तातडीने निकाली काढणे, कर्जवसुली स्थगितीची प्रभावी अंमलबजावणी, रब्बी हंगामासाठी पीककर्ज व निविष्ठांची मदत, चारा-पाणी नियोजन आणि कृषी पंपांच्या वीज पुरवठ्याबाबत शेतकर्‍यांना दिलासा देण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली.विशेष दुष्काळ कृती आराखड्यात नदी-नाले खोलीकरण व गाळ काढणे, बंधारे, शेततळी, विहीर पुनर्भरण, पाणलोट विकास आणि जलसाठवण क्षमता वाढविण्याच्या कामांना प्राधान्य देऊन ही कामे मिशन मोडवर राबवावीत.
 
 
यासाठी विशेष निधी उपलब्ध करून जलसंधारणाची कामे रोजगार हमी व इतर उपलब्ध निधीशी जोडावीत, अशी मागणी विजयराज शिंदे यांनी केली आहे. आज शेतकर्‍याला दुष्काळाच्या संकटातून मदत करणे गरजेचे आहे; पण उद्या पुन्हा दुष्काळ आला की मदतीसाठी हात पसरावे लागू नयेत, अशी कायमस्वरूपी जलसुरक्षेची व्यवस्था उभी करणे हीच खरी गरज आहे, अशी भूमिका विजयराज शिंदे यांनी मांडली. दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकर्‍यांच्या अडचणी जाणून घेतल्याबद्दल शिंदे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार देखील मानले. यावेळी निवेदन सादर करते वेळी जेष्ठ नेते दीपकजी वारे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत बरदे, जिल्हा उपाध्यक्ष देविदास पाटील, अनिल जाधव, मोहम्मद अकिल, नारायण हेलगे,डॉ तेजराव नरवाडे ई भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.