नवी दिल्ली
priyanka kakkar आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्त्या प्रियंका कक्कड यांनी शनिवारी, ३ ऑक्टोबर रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे माजी आमदार श्याम सुंदर शर्मा आणि पत्रकार रजत राकेश टंडन यांनीही काँग्रेसची वाट धरली. दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव तसेच काँग्रेसचे वरिष्ठ नेते राजीव शुक्ला आणि पवन खेरा यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
पेशाने वकील असलेल्या प्रियंका कक्कड या २०२३ पासून ‘आप’च्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्त्या म्हणून कार्यरत होत्या. वृत्तवाहिन्यांवरील चर्चांमध्ये त्या पक्षाची भूमिका आक्रमकपणे मांडत असत. २०१३ मध्ये त्या आम आदमी पक्षात दाखल झाल्या होत्या. पक्षात विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्यानंतर त्यांना राष्ट्रीय प्रवक्त्याची जबाबदारी देण्यात आली होती.काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर कक्कड यांनी आपल्या निर्णयामागची भूमिका स्पष्ट केली. आपण लहानाच्या मोठ्या झालो त्या दिल्लीचे स्वरूप पुन्हा पाहायचे आहे, असे सांगत त्यांनी स्वच्छ, हिरवीगार, प्रगत आणि सुरक्षित दिल्लीची अपेक्षा व्यक्त केली. भारतीय राजकारणातील दशकभराहून अधिक काळाच्या अनुभवातून काँग्रेसच ही दिशा साध्य करू शकते, असा दावा त्यांनी केला. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचेही कौतुक केले आणि त्यांना विश्वासार्ह व प्रामाणिक नेता असल्याचे म्हटले.
आम आदमी पक्ष सोडण्याबाबत बोलताना कक्कड यांनी पक्षाच्या सुरुवातीच्या भूमिकांमध्ये आणि नंतरच्या कार्यपद्धतीत बदल झाल्याचा आरोप केला. पक्षाच्या सुरुवातीच्या काळात नेते बंगला आणि गाडी घेणार नसल्याचे सांगत होते; मात्र नंतर खासगी प्रवासासाठी हेलिकॉप्टरचाpriyanka kakkar वापर सुरू झाल्याचे त्यांनी म्हटले. या बाबींचे समर्थन करणे आपल्याला शक्य राहिले नसल्याचे कक्कड यांनी सांगितले. तसेच आम आदमी पक्षाशी सुरुवातीला अनेक विचारवंत आणि कार्यकर्ते जोडले गेले, मात्र ते पक्षात जास्त काळ टिकले नाहीत, असा दावाही त्यांनी केला.पक्षातील पदांबाबतही कक्कड यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही नेत्यांनी बूथ पातळीवर काम केले नसतानाही त्यांना राजस्थानमधून थेट पंजाबमध्ये महत्त्वाची पदे देण्यात आली. त्याचबरोबर बंगला आणि गाडी यांसारख्या सुविधा दिल्या जात असल्याची टीकाही त्यांनी केली. या बाबींचा बचाव करणे आपल्यासाठी कठीण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या तिघांमध्ये प्रियंका कक्कड यांच्यासोबत श्याम सुंदर शर्मा आणि रजत राकेश टंडन यांचाही समावेश आहे. काँग्रेसने त्यांच्या पक्षप्रवेशाची अधिकृत माहिती दिली आहे. शर्मा हे उत्तर प्रदेशचे माजी आमदार असून टंडन हे पत्रकार आहेत. टंडन यांचा संबंध स्वातंत्र्यसैनिक पुरुषोत्तम दास टंडन यांच्या कुटुंबाशी असल्याचे काँग्रेसने नमूद केले आहे.