मुंबई,
Pune Teachers' Constituency महाराष्ट्र विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा महत्त्वाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. पुणे शिक्षक मतदारसंघावर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांकडून दावा करण्यात येत होता. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेनंतर पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा भाजपला देण्याचा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे.महायुतीमध्ये विधान परिषदेच्या विविध मतदारसंघांचे वाटप निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार पुणे शिक्षक, पुणे पदवीधर आणि नागपूर पदवीधर या तीनही जागा भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला आल्या आहेत. अमरावती मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाला, तर छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला देण्यात आल्याचे समोर आले आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्यानंतर पक्षाच्या पातळीवर उमेदवार निवडीची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान तीन मतदारसंघांसाठी संभाव्य उमेदवारांची यादी केंद्रीय नेतृत्वाकडे सादर करण्यात आली.भाजपने प्रत्येक मतदारसंघासाठी पाच संभाव्य उमेदवारांची नावे सुचवली आहेत. त्यामुळे पुणे शिक्षक, पुणे पदवीधर आणि नागपूर पदवीधर या तीन जागांसाठी एकूण 15 नावांचा पर्याय केंद्रीय नेतृत्वासमोर ठेवण्यात आला आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातील प्रमुख इच्छुकांचाही या यादीत समावेश असून, केंद्रीय निवडणूक समितीकडून अंतिम उमेदवाराच्या नावावर निर्णय होणार आहे.
दरम्यान, पुणे शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक स्थानिक इच्छुकांनीही तयारी केली होती. मात्र, जागा भाजपच्या वाट्याला गेल्याने या इच्छुकांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे. महायुतीतील समन्वय कायम ठेवण्यासाठी दोन्ही मित्रपक्षांमधील नाराज इच्छुकांची वरिष्ठ नेत्यांकडून समजूत काढली जाईल, असे भाजप नेत्यांकडून सांगण्यात आले आहे. दुसरीकडे, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. काँग्रेसने आघाडीतील चर्चा पूर्ण होण्यापूर्वीच उमेदवारांची घोषणा केल्याने महाविकास आघाडीत नाराजी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी महाविकास आघाडीची बैठक झाली. मात्र, या बैठकीत जागावाटपाबाबत अंतिम तोडगा निघाला नसल्याचे सांगितले जात आहे.