गोंदिया,
gondia गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागरा परिसरातील शेतशिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम, चारचाकी वाहन व जुगाराचे साहित्य असा एकूण ४ लाख ७० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई २ ऑक्टोबर रोजी करण्यात आली.
गोंदिया ग्रामीण पोलिसांचे पथक अवैध धंद्यांविरोधात पेट्रोलिंग करीत असताना नागरा परिसरातील शेतशिवारात काही जण ५२ तासपत्तीवर पैशांची बाजी लावून जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड टाकली. यावेळी निलेश पन्नालाल मचाळे, प्रणय राजेश नागरीकर, सुभाष राजाराम बान्ते तिघेही राहणार नागरा, इरफान मुबारक शेख, अनिल हेमराज बिसेन दोघेही राहणार अंभोरा व आकाश शम्भूदयाल अग्रवाल रा. सावरी हे सहा जण जुगार खेळताना आढळून आले.
पोलिसांनी पंचांसमक्ष त्यांची झडती घेतली असता ६० हजार ५०० रुपये रोख, ४ लाख १० हजार रुपये किमतीचे चारचाकी वाहन आणि जुगाराचे साहित्य, असा एकूण ४ लाख ७० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांची चाहूल लागताच काही जुगारी घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या निर्देशानुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशचंद्र शुक्ला तसेच प्रभारी अधिकारी दिपम दहिवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.