न्यू चंदीगड,
rohit-sharma भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये दमदार फॉर्ममध्ये दिसत असून, वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात त्याने मोठी ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. सलामीवीर म्हणून एकदिवसीय सामन्यांमध्ये १० हजार धावांचा टप्पा पार करत रोहितने सचिन तेंडुलकरचा तब्बल २२ वर्षे जुना विक्रम मागे टाकला. हा टप्पा गाठणारा रोहित जगातील चौथा सलामीवीर ठरला आहे.
सलामीवीर म्हणून सर्वात कमी डावांत १० हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम यापूर्वी सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने २००४ मध्ये ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे ही कामगिरी केली होती. मात्र, रोहितने सचिनपेक्षा १२ डाव कमी खेळत हा टप्पा गाठला. त्याने केवळ २०२ डावांत सलामीवीर म्हणून १० हजार धावा पूर्ण केल्या. रोहितपूर्वी सचिन तेंडुलकर, वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आणि श्रीलंकेचा सनथ जयसूर्या यांनीच सलामीवीर म्हणून एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.
सलामीवीर म्हणून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत सचिन तेंडुलकर १५ हजार ३१० धावांसह आघाडीवर आहे. सनथ जयसूर्याने १२ हजार ७४० धावा केल्या आहेत, तर ख्रिस गेलनेही १० हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. रोहितने आता या यादीत स्थान मिळवले असून, पुढील काळात गेलला मागे टाकण्याची संधी त्याच्याकडे आहे.
रोहितच्या एकदिवसीय कारकिर्दीत आतापर्यंत ३५ शतके आणि ३५ अर्धशतकांचा समावेश आहे. मागील सामन्यातही त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध शतकी खेळी करत ७५ चेंडूंमध्ये १० चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने १०१ धावा केल्या होत्या. २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर रोहितचा हा फॉर्म भारतीय संघासाठी महत्त्वाचा ठरत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ लवकरच जाहीर होणार असून, त्यात रोहितचा समावेश होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.