समृद्धी’वर पुन्हा अपघात, ९ गंभीर जखमी

मजुरांना घेऊन जाणारे वाहन उलटले

    दिनांक :03-Oct-2026
Total Views |
अमरावती/धामणगाव,
samruddhi-accidentनागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून आज तळेगाव दशासर पोलिस ठाण्याच्या हद्दीत धावत्या पिकअप वाहनाचे पुढील एक चाक अचानक निघाल्याने वाहन अनियंत्रित होऊन महामार्गावर उलटले. या अपघातात ९ मजूर गंभीररीत्या जखमी झाले, तर ८ जण किरकोळ जखमी झाले. सर्व १७ जखमींना उपचारासाठी धामणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 

ggggej 
माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील २३ मजूर कामाच्या शोधासाठी बुलढाण्याकडे एमएच ३७/ टी ४१८३ क्रमांकाच्या महिंद्रा पिकअप वाहनातून जात होते. आज सकाळी मुंबईच्या दिशेने चॅनेल क्रमांक १२७ जवळ अचानक पिकअप वाहनाचा पुढील डाव्या बाजूचा टायर निघाला. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगातील पिकअप वाहन महामार्गावर उलटले.
 
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. त्यांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले आणि जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. या अपघातात ९ मजूर गंभीररीत्या जखमी झाले आहेत. उषा शिवरकर, रीना रामटेके, बंडू उरकुडे, संजय सौंदरकर, शांता सोनवणे, वंदना बुराडे यांचा गंभीर जखमींमध्ये समावेश आहे. या अपघातात ८ जण किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वाहनचालक ओम पंढरी तनपुरे (वय २६, रा. वाकद, ता. रिसोड) यांच्यासह काही प्रवाशांना सुदैवाने दुखापत झाली नाही. समृद्धी महामार्गावर गुरुवारी २ ऑक्टोबरला झालेल्या भीषण अपघातात दुर्गादेवीची मूर्ती घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकअपला ट्रकने धडक दिल्याने वर्धा येथील ७ भाविकांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते.