बारामती
sharad pawar ज्येष्ठ नेते शरद पवार सध्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करत असून, गावोगावी जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. वयाच्या ८६व्या वर्षीही रणरणत्या उन्हात शेताच्या बांधावर जाऊन ते शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत. तासन्तास शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांच्या निवेदनांचा स्वीकार करत आहेत. तसेच विविध मागण्यांवर सरकारशी चर्चा करण्याचे आश्वासन देत त्यांना धीर देत आहेत. बारामती तालुक्यातील जवळार्जुन येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना मात्र एक मिश्किल प्रसंग घडला.
जवळार्जुन येथे पोहोचल्यानंतर शरद पवार यांनी शेतकऱ्यांकडून दुष्काळाच्या परिस्थितीची माहिती घेतली. चारा, पाणी, पिकांची स्थिती तसेच शेतीशी संबंधित विविध अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर आपापल्या समस्या मांडत निवेदने दिली. काहींनी वैयक्तिक अडचणींचाही पाढा वाचला.याच संवादादरम्यान एका शेतकऱ्याने आपल्या कुटुंबाचा शरद पवार यांच्याशी असलेला जुना संबंध आणि निष्ठा सांगण्याचा प्रयत्न केला. ‘माझे वडील मला बारामतीला घेऊन जायचे. आमचे वडील म्हणायचे की, छाती फाडली तरी साहेबच दिसतील,’ असे त्या शेतकऱ्याने सांगितले. त्याच्या या वक्तव्यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
दरम्यान, शरद पवार यांनी दुष्काळाच्या प्रश्नावर सरकारकडे विविध मागण्या मांडणार असल्याचे सांगितले. येत्या दोन ते तीन दिवसांत मुख्यमंत्री यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतीसाठी तसेच शेतीशी संबंधित कारणांसाठी घेतलेले कर्ज, फळबागांसाठी आणि मोटारीसाठी घेतलेले कर्ज संपूर्णपणे माफ करण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे पवारांनी सांगितले. याशिवाय शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावे, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावेत आणि दुष्काळी उपाययोजनांच्या मंजुरीचे अधिकार तालुका पातळीवर द्यावेत, अशा मागण्याही त्यांनी मांडल्या.
दुष्काळाच्या परिस्थितीबाबत sharad pawar बोलताना काही तालुक्यांमध्ये अद्याप दुष्काळ जाहीर करण्यात आलेला नसल्याचा मुद्दाही पवारांनी उपस्थित केला. गावकऱ्यांनी आपल्या गावाचे आणि शिवाराचे स्वरूप बदलण्यासाठी मोठे कष्ट घेतले असून, त्यातून गावकऱ्यांचे राहणीमानही बदलल्याचे त्यांनी सांगितले. मात्र सध्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून, त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे पवार म्हणाले.‘सर्वांच्या अडचणी काय आहेत, हे आपल्याला माहिती आहे. मी सरकारमध्ये असताना या गावात तीन वेळा येऊन गेलो आहे. तुम्ही लोकांनी गाव बदलण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यामुळे गाव बदललेले दिसत आहे. मात्र दुष्काळ असताना तुमच्या-माझ्या हातात काही नाही,’ असेही पवार यांनी यावेळी शेतकऱ्यांना सांगितले.