छत्रपती संभाजीनगर
sodexo canteen action वाळूज औद्योगिक क्षेत्रातील गुडईयर साऊथ एशिया टायर्स कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी चालवण्यात येणाऱ्या कॅन्टीनमध्ये अस्वच्छता आणि अन्नाच्या गुणवत्तेबाबत गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. या कॅन्टीनचे व्यवस्थापन सोडेक्सो इंडिया सर्व्हिसेस प्रा. लि.कडून केले जाते. कॅन्टीनबाबत मिळालेल्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) अधिकाऱ्यांनी ३० सप्टेंबर रोजी अचानक तपासणी केली. या तपासणीत कॅन्टीनला अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या निकषांमध्ये केवळ ४२ टक्के गुण मिळाले. त्यानंतर प्रशासनाने कॅन्टीनचे कामकाज तातडीने बंद करण्याची कारवाई केली.
कॅन्टीनमध्ये स्वच्छतेच्या मूलभूत नियमांकडेही दुर्लक्ष झाल्याचे तपासणीत समोर आले. स्वयंपाकघर, भाजीपाला कापण्याची जागा तसेच कर्मचाऱ्यांना जेवण देण्यासाठी असलेल्या टेबलांवर मोठ्या प्रमाणात चिखल आणि घाण साचलेली होती. कॅन्टीनच्या जमिनीवरील काही फरश्या तुटलेल्या अवस्थेत आढळल्या. सांडपाण्याच्या नाल्या तुंबल्याने परिसरात दुर्गंधी निर्माण झाली होती.
अन्न साठवण्यासाठी वापरण्यात येणारा फ्रीजही खराब स्थितीत असल्याचे तपासणीदरम्यान आढळले. फ्रीजला गंज लागला होता, तर त्याचा दरवाजाही तुटलेल्या अवस्थेत होता. त्याहून गंभीर बाब म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी अन्नपदार्थ एकाच ठिकाणी साठवले जात असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. अशा प्रकारच्या अयोग्य साठवणुकीमुळे अन्न दूषित होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
तपासणीवेळी काही ठिकाणी शिळ्या अन्नपदार्थांवर कोळ्याची जाळीही आढळून आली. कॅन्टीनमधील एकूणच स्वच्छता, अन्न साठवणूक आणि स्वयंपाकाच्या व्यवस्थेबाबत गंभीर त्रुटी आढळल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेतली.
FDAने कॅन्टीनमधील स्वयंपाक, अन्नाची साठवणूक आणि कर्मचाऱ्यांना जेवण वाढण्याचे काम तातडीने बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. कॅन्टीनमध्ये आवश्यक स्वच्छता आणि सुधारणा केल्याचा ठोस पुरावा सादर करून फेरतपासणी होईपर्यंत ते पुन्हा सुरू करता येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या कारवाईमुळे वाळूज औद्योगिक परिसरात खळबळ उडाली असून, मोठ्या औद्योगिक आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांच्या कॅन्टीनमधील अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.