सोया-मशरूमची बिर्याणी; चवीचा नवा फंडा!

    दिनांक :03-Oct-2026
Total Views |
soya-mushroom-biryani रात्रीच्या जेवणासाठी चविष्ट आणि प्रथिनांनी समृद्ध पदार्थ हवा असेल तर सोया-मशरूम बिर्याणी हा एक वेगळा पर्याय ठरू शकतो. या बिर्याणीमध्ये सोया, मशरूम आणि ब्राऊन बासमती तांदळाचा वापर केला जातो. एका वाटीतील या बिर्याणीमधून अंदाजे ३५ ग्रॅम प्रथिने, ८ ग्रॅम तंतू आणि ४७० उष्मांक मिळतात. पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत ब्राऊन बासमती तांदळामध्ये तंतूंचे प्रमाण अधिक असल्याने या बिर्याणीला पौष्टिकतेची जोड मिळते.
 
soya-mushroom-biryani
 
ही बिर्याणी तयार करण्यासाठी ६० ग्रॅम सोया चंक्स, १५ ते १८ चिरलेले मशरूम, दोन एअर फ्राय केलेले कांदे, चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने घ्यावीत. यामध्ये एक मोठा चमचा बिर्याणी मसाला, एक मोठा चमचा कसुरी मेथी, एक छोटा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, हिरवी मिरची-लसूण पेस्ट, लिंबाचा रस आणि एक मोठा चमचा गूळ पावडर मिसळावी. भातासाठी ८५ ग्रॅम ब्राऊन बासमती तांदूळ, दालचिनीची काडी, तीन ते चार काळी मिरी, एक छोटा चमचा तूप आणि चिमूटभर मीठ लागेल. बिर्याणीच्या शेवटच्या थरासाठी ताजा पुदिना आणि केशर मिसळलेले ३० ते ३५ मिली टोन्ड दूध वापरावे.
 
सुरुवातीला सोया चंक्स उकळून त्यातील अतिरिक्त पाणी चांगले पिळून काढावे. कांदे बारीक कापून त्यावर थोडे तेल शिंपडावे आणि ते तपकिरी व कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यावेत. त्यानंतर सोया चंक्स, मशरूम, भाजलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना, बिर्याणी मसाला, कसुरी मेथी, लाल तिखट, मीठ, हिरवी मिरची-लसूण पेस्ट, लिंबाचा रस आणि गूळ पावडर एकत्र करावी. हे मिश्रण व्यवस्थित कालवून साधारण १० ते १५ मिनिटे मुरू द्यावे.
 
दरम्यान, ब्राऊन बासमती तांदूळ दालचिनी, काळी मिरी, तूप आणि चिमूटभर मीठ घालून ९० टक्के शिजवून घ्यावा. त्यानंतर अतिरिक्त पाणी काढून तांदूळ बाजूला ठेवावा. पातेल्यात एक मोठा चमचा तूप गरम करून त्यात जिरे घालावे. जिरे तडतडल्यानंतर त्यात मुरवलेले सोया-मशरूमचे मिश्रण टाकून मंद आचेवर १० ते १२ मिनिटे शिजवावे.
 
मिश्रण शिजल्यानंतर त्यावर ९० टक्के शिजवलेला ब्राऊन बासमती तांदूळ पसरावा. त्यावर उरलेला भाजलेला कांदा, ताजा पुदिना आणि केशराचे दूध घालावे. पातेल्यावर झाकण ठेवून मंद आचेवर आणखी सहा ते सात मिनिटे शिजवावे. या प्रक्रियेमुळे तांदूळ पूर्णपणे शिजतो आणि सोया-मशरूमच्या मिश्रणातील मसाल्यांची चव भातामध्ये व्यवस्थित मिसळते. त्यानंतर गरमागरम सोया-मशरूम बिर्याणी वाढता येईल.