तीन महिन्यांपासून एसटीची पार्सल सेवा ठप्प

महामंडळाचे लाखोंचे नुकसान

    दिनांक :03-Oct-2026
Total Views |
वरोडा,
st-parcel-service एसटी महामंडळाचे कोट्यावधीचे देयके थकित असल्याने कंत्राटदार हेनेकस कंपनीचे कंत्राट महामंडळाने रद्द केल्याने गेल्या 3 महिन्यांपासून पार्सल सेवा ठप्प पडली आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी व्यापार्‍यांना अडचणींचा सामना करावा लागत असून, महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. दुसरीकडे या पार्सल व्यवसायावर अवलंबून असणार्‍यांवर बेरोजगारीची वेळ आली आहे.
 
 
st-parcel-service
 
एसटी महामंडळाचे संपूर्ण महाराष्ट्रातील 3 वर्षांचे पार्सल वाहतुकीचे कंत्राट 1 डिसेंबर 2024 ते 30 डिसेंबर 2027 पर्यंत महामंडळाने पुणे येथील हेनेकस कंपनीला दिले होते. या कंपनीने महाराष्ट्रातील सुमारे 300 च्यावर डेपोवर पार्सल कार्यालय प्रतिनिधींची मोठ्या रकमेचे डिपॉझिट घेऊन नियुक्ती केली. हेनेकस कंपनीने कोट्यावधी रुपयांची देयके थकित ठेवल्याने 19 जून रोजी अचानक महामंडळाने कंपनीचे पार्सल कंत्राट रद्द केले. महाराष्ट्रातील सर्व पार्सल ऑफिसचा ताबा महामंडळाने घेतला असून, तेव्हापासून सर्व पार्सल ऑफीस बंद आहेत. या विरोधात या कंपनीने न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्याची बाब पुढे आली आहे.
पार्सल सेवा सुरळीत ठेवण्यासाठी या कंपनीचे कंत्राट रद्द केल्यावर महामंडळाने नवीन टेंडर काढून कंत्राट देणे आवश्यक होते. परंतु, 3 महिन्यांचा कालावधी लोटला तरी याबाबत महामंडळाने ठोस निर्णय न घेतलेला नसल्याने ही पार्सल सेवा आता पूर्णपणे बंद झाली आहे. अनेक भागांमध्ये एसटीचे जाळे पसरले असल्यामुळे ही पार्सल सेवा महत्त्वाची असून, त्यामुळे व्यापार्‍यांना मात्र प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. विशेष म्हणजे, एस.टी. महामंडळाने हेनेकस कंपनीचे पार्सल सेवेचे 3 वर्षांचे कंत्राट दीड वर्षातच रद्द केले.
 
पार्सल सेवेबाबत लवकरच तोडगा निघेलः उत्कर्षा चौधरी
या संदर्भात वरोडा आगार प्रमुख उत्कर्ष चौधरी यांना विचारले असता, मागील काही महिन्यापासून ही सेवा पूर्णपणे बंद झालेली आहे. याचा परिणाम ग्रामीण भागातील पार्सल सेवेवर झाला असून, यावर लवकर तोडगा निघणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या.