मुंबई
thackeray brothers मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि मतदारयादी पुनर्रनिरीक्षण प्रक्रियेतील (SIR) कथित गैरप्रकाराच्या मुद्यावरुन राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. याच मुद्यावरुन उद्या म्हणजे 4 ऑक्टोबरला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मुंबईत मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात सर्वच राजकीय पक्षांनी सहभागी व्हावं असं आवाहन देखील ठाकरे बंधूंनी केलं आहे. यावर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ठाकरे बंधूंच्या आंदोलनात किती पक्ष सहभागी होणार, हे पाहणे महत्त्वाचे असल्याचे रामदास कदम म्हणाले. उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावे. निवडणूक आयोगाला बदनाम करून अपयश लपवण्याचा आरोप कदम यांनी केला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाकरे बंधू आंदोलन करत आहेत. काँग्रेसचे अधिक खासदार निवडून आले तेव्हा ज्ञानेश कुमार यांनी गडबड केली नाही, असे उद्धव ठाकरेंना वाटते का? असा सवाल कदम यांनी केला. स्वतःचे अपयश लपवण्यासाठी निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचे काम उद्धव ठाकरे करत असल्याचा आरोप कदम यांनी केला. या प्रवृत्तीचा आपण धिक्कार करत असल्याचे कदम म्हणाले.
बूंद से जाती है, वो हौद से नहीं आती
जनतेच्या न्यायालयात जाण्याची भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली होती. निवडणुकीत जनतेने काय कौल दिला, हे लक्षात ठेवावे, असे कदम म्हणाले. बूंद से जाती है, वो हौद से नहीं आती, हे उद्धव ठाकरेंनी लक्षात ठेवावे, असा टोला देखील कदमांनी लगावला. जवळची माणसे का सोडून गेली, याचे आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला देखील कदमांनी दिला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राची करमणूक करत असून नौटंकीच्या माध्यमातून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. एक दिवस दूध का दूध पाणी का पाणी होईल, असेही कदम यावेळी म्हणाले.