एलन मस्कसोबत ब्रेकअपनंतर शिवॉनची भावनिक पोस्ट

    दिनांक :03-Oct-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलन मस्क आणि न्यूरालिंकच्या कार्यकारी अधिकारी शिवॉन झिलिस यांच्या वैयक्तिक नात्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. शिवॉन झिलिस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर भावनिक पोस्ट करत एलन मस्क यांच्यासोबतचे नाते संपुष्टात आल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीपर्यंत दोघांमध्ये प्रेमळ संवाद सुरू असल्याचेही त्यांनी आपल्या पोस्टमधून नमूद केले आहे.शिवॉन यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, ज्या नात्यात काही काळापूर्वीपर्यंत प्रेम आणि जिव्हाळा होता, त्या नात्यातून बाहेर पडणे सोपे नसते. या बदलाची कोणतीही पूर्वकल्पना मिळाली नव्हती, असेही त्यांनी नमूद केले. नाते संपल्यामुळे दुःख झाल्याचे त्यांनी सांगितले असले, तरी एलन मस्क यांच्याबद्दल मनात आदर आणि आपुलकी कायम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
 

The Elon Musk-Shivon breakup 
 
आपल्या कुटुंबामुळे मस्क यांना शांतता, स्थैर्य आणि आपलेपणाची भावना मिळावी, अशी इच्छा असल्याचे शिवॉन यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. त्यांच्या मते, कुटुंब हे आनंद आणि समाधान देणारे ठिकाण होते.एलन मस्क आणि शिवॉन झिलिस हे चार मुलांचे पालक आहेत. २०२१ मध्ये त्यांना जुळी मुले स्ट्रायडर आणि एझ्योर झाली होती. त्यानंतर २०२४ मध्ये आर्केडिया नावाच्या मुलीचा आणि २०२५ मध्ये सेल्डन लाइकर्गस या मुलाचा जन्म झाल्याची माहिती समोर आली होती.
 
 
शिवॉन यांनी आपल्या मुलांना आयुष्यातील सर्वात मोठा आनंद असल्याचे म्हटले आहे. वैयक्तिक नाते संपले असले तरी पुढील काळात दोघांनी चांगले मित्र आणि सह-पालक म्हणून मुलांची जबाबदारी पार पाडावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.शिवॉन यांनी एलन मस्क यांच्यासोबत झालेल्या अलीकडील संभाषणाचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. वृत्तांनुसार, २४ सप्टेंबर रोजी झालेल्या या संवादात दोघांनी एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त केले होते. मस्क यांनी एका डिनर कार्यक्रमासंदर्भातही चर्चा केली होती आणि जोडीदाराला सोबत आणण्याची माहिती आधी असती, तर त्यांनी शिवॉन यांनाही निमंत्रित केले असते, असे सांगितले होते.
 
 
मात्र, त्यानंतर काहीच दिवसांत नाते संपल्याची माहिती समोर आल्याने या घडामोडींची चर्चा सुरू झाली. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी एलन मस्क आता ‘एक्स’वर शिवॉन यांना फॉलो करत नसल्याचेही निदर्शनास आणून दिले.शिवॉन यांच्या पोस्टनंतर एलन मस्क यांनी याबाबत सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, शिवॉन यांनी आपल्या संदेशातून मस्क यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करत त्यांच्या आनंदासाठी प्रार्थना करत राहणार असल्याचे म्हटले आहे. चार मुलांच्या संगोपनाची जबाबदारी दोघांवरही असल्याने या घडामोडीकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे. रोमँटिक नाते संपले असले तरी मुलांच्या भविष्यासाठी सहकार्य कायम ठेवण्याची भूमिका शिवॉन यांनी स्पष्ट केली आहे.