उत्तर प्रदेश
mp road accidents उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात शनिवारी पहाटे झालेल्या दोन भीषण रस्ते अपघातांत पाच जणांचा मृत्यू झाला, तर अनेक प्रवासी जखमी झाले. उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात पूर्वांचल एक्स्प्रेस-वेवर ट्रकने बसला मागून धडक दिल्याने दोन चालकांचा मृत्यू झाला. या अपघातात ट्रकचालक, क्लिनरसह बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले. दुसरीकडे, मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील बदनावर येथे भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने तीन जणांचा मृत्यू झाला असून एक मुलगी जखमी झाली आहे.
बाराबंकीतील हैदरगडच्या सुबेहा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेरांवा गावाजवळ शनिवारी पहाटे सुमारे पाच वाजता हा अपघात झाला. पूर्वांचल एक्स्प्रेस-वेवरील ५२.७ किलोमीटरच्या ठिकाणी दिल्लीहून सुमारे ८० प्रवाशांना घेऊन बिहारकडे जाणारी बस थांबली होती. बसचे दोन्ही चालक चाकांमधील हवेची तपासणी करीत असताना मागून आलेल्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली.
या धडकेत दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू झाला. अजय कुमार यादव आणि दीप चन्दर राय अशी मृतांची ओळख पटली आहे. अपघातात ट्रकचालक आणि क्लिनरसह बसमधील अर्धा डझनहून अधिक प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच सुबेहा पोलिस, एक्स्प्रेस-वे मदत पथक आणि रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी बाराबंकी जिल्हा मुख्यालयात पाठविण्यात आले असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. धडकेची तीव्रता एवढी होती की ट्रकचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.
काही महिन्यांपूर्वीही पूर्वांचल एक्स्प्रेस-वेवर झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा त्याच मार्गावर झालेल्या या अपघातामुळे एक्स्प्रेस-वेवरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील बदनावरच्या पिटगारा चौराह्यावरही शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. महू-नीमच फोरलेन मार्गावरील पिटगारा चौराह्यावर भरधाव ट्रकने दुचाकीवरील प्रवाशांना धडक दिली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला, तर एक मुलगी जखमी झाली. जखमी मुलीला उपचारासाठी बदनावरच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर संतप्तmp road accidents झालेल्या ग्रामस्थांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून फोरलेन मार्ग रोखून धरला. सुमारे तासभर रास्ता रोको सुरू असल्याने रतलाम-इंदूर मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दोन्ही राज्यांतील या अपघातांमुळे शनिवारी पहाटेपासूनच महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला.