वैद्यकीय प्रवेशाच्या ९८.७९ टक्के जागा भरल्या

एमबीबीएसचे ९९.०४ टक्के, तर बीडीएसचे ९७.९३ टक्के प्रवेश पूर्ण

    दिनांक :30-Oct-2026
Total Views |
मुंबई,
medical-admission-seats-filled वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यंदाचे शैक्षणिक वर्ष समाधानकारक ठरले असून, राज्यातील एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या एकूण ११ हजार ४३१ जागांपैकी तब्बल ११ हजार २९३ जागांवर प्रवेश पूर्ण झाले आहेत. म्हणजेच प्रवेशाची टक्केवारी ९८.७९ इतकी झाली असून, केवळ १३८ जागा रिक्त राहिल्या आहेत. विशेष म्हणजे, राज्यातील ४३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमबीबीएसच्या सर्वच्या सर्व ५ हजार ६५ जागांवर प्रवेश झाले आहेत. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया यंदा अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात आली.
 
 
medical
 
राज्यातील एमबीबीएसच्या एकूण आठ हजार ८१४ जागांपैकी ८ हजार ७३० जागांवर प्रवेश झाले असून, प्रवेशाची टक्केवारी ९९.०४ आहे. यामध्ये शासकीय महाविद्यालयांनी शंभर टक्के प्रवेशाचे उद्दिष्ट साध्य केले. बीडीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची स्थितीही समाधानकारक आहे. यापूर्वी सीईटी कक्षाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या आणि रिक्त जागांसाठी एक फेरी पूर्ण झाल्यानंतर उर्वरित जागा संबंधित संस्थांच्या स्तरावर भरल्या जात होत्या. मात्र, यंदा वैद्यकीय शिक्षण विभागाने प्रवेश नियमांत बदल केल्यामुळे सर्व प्रवेश फेऱ्या सीईटी कक्षामार्फतच घेण्यात आल्या. केंद्रीभूत प्रवेशाच्या तीन आणि रिक्त जागांसाठीच्या तीन अशा एकूण सहा फेऱ्या पार पडल्या. या बदलामुळे प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांच्या कोणत्याही तक्रारी प्राप्त झाल्या नसल्याचे सीईटी कक्षाने स्पष्ट केले आहे.