टेकडा येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचीनवीन शाखा सुरू होणार

    दिनांक :30-Oct-2026
Total Views |
सिरोंचा,
gramin-bank सिरोंचा तालुक्यातील दुर्गम टेकडा गाव व परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची बँक शाखेची मागणी आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. गावात बँक शाखा नसल्याने नागरिकांना बँकिंग व्यवहारांसाठी तब्बल 30 ते 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिरोंचा येथे जावे लागत होते. यामुळे वेळ आणि आर्थिक खर्चाचा मोठा भार नागरिकांवर पडत होता. या समस्येची दखल मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून, टेकडा येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेची नवीन शाखा सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे.
 
 
gramin-bank
 
टेकडा परिसरातील नागरिकांची समस्या मुख्यमंत्र्यांचे ओएसडी अनिरुद्ध पालकर यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. त्यानंतर पालकर यांनी ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना टेकडा येथे प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
 
 
या निर्देशानुसार 29 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र ग्रामीण बँक, चंद्रपूरचे उपक्षेत्रीय व्यवस्थापक रमण सी. नंदनवार यांच्यासह बँक अधिकार्‍यांच्या पथकाने टेकडा गावाला भेट दिली. यावेळी प्रस्तावित शाखेसाठी जागेची पाहणी करण्यात आली. तसेच शाखा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा, स्थानिक परिस्थिती आणि इतर बाबींची माहिती घेऊन ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली.
टेकडा येथे बँकेची शाखा सुरू झाल्यास टेकडा व परिसरातील सुमारे 15 गावांतील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. शेतकरी, महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना स्थानिक पातळीवर बँकिंग सुविधा उपलब्ध होतील. त्यामुळे बँकिंग कामासाठी 30 ते 35 किलोमीटरचा प्रवास करण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
 
 
दरम्यान, या मागणीची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी सुरू केल्याबद्दल टेकडा व परिसरातील ग्रामस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ओएसडी अनिरुद्ध पालकर तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या अधिकार्‍यांचे आभार मानले आहेत. दुर्गम भागातील नागरिकांना बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.