प्रेम व वात्सल्य नसणारा माणूस यंत्रासारखा असतो!: प्रा. गणेश शिंदे

    दिनांक :30-Oct-2026
Total Views |
कारंजा ला, 
prof-ganesh-shinde आपल्याला जवळील संसाधने ही आपल्याबरोबरच गरजू व्यक्तींना सुद्धा उपयोगी पडावी म्हणून आपल्याजवळ जे काही आहे ते इतरांना देता आले पाहिजे. स्वतःवर जसे प्रेम करतो तसे इतरावर सुद्धा करता आले पाहिजे. इतरांच्या वेदना बघून संवेदना जाग्या झाल्या पाहिजे. जेव्हा माणसाच्या डोळ्यातील प्रेम, वात्सल्य संपते तेव्हा समजून घ्यावे की, तो माणूस यंत्रासारखा असतो! असे भावपूर्ण उद्गार पुणे येथील प्रसिद्ध व्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांनी काढले. ते कै. नानासाहेब दहीहांडेकर मैदानावर सुरू असलेल्या शरद व्याख्यानमालेत या जगण्यावर शतदा प्रेम करावे या विषयावर बोलत होते.
 
 
prof-ganesh-shinde
 
प्रारंभी व्याख्यानमालेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष साबू व वैशाली आमले यांनी त्यांचे स्वागत केले तर प्रमुख अतिथी जनार्दन लिपने यांचे स्वागत प्रज्वल गुलालकरी यांनी केले. मानवी जीवनाचा प्रवास सुंदर कसा होईल, याविषयी शिंदे म्हणाले की, आपले जीवन परस्परांवर अवलंबून आहे. म्हणून मित्रांना जपा, नातेवाईकांना जपा,घरातील वृद्धांना जपा .निसर्गाला जपा. आपले अस्तित्व क्षणभंगुर आहे. माणूस जन्माला येणार हे नऊ महिने अगोदर समजते. तेव्हा आनंदाचे वातावरण असते, मात्र मरणार केव्हा हे नऊ सेकंद अगोदर सुद्धा समजत नाही. माणसाचा श्वास थांबला की लोक स्मशानभूमीत नेतात आणि होळी पेटवावी तसे सहज पेटवून देतात. म्हणून प्रत्येकाने अंतर्मनात डोकावून पहावे तेव्हा समजेल की जीवन सुंदर आहे तर मृत्यू सत्य आहे. माणूस आणि निसर्ग यांचा संबंध विशद करताना शिंदे म्हणाले की, निसर्गातील प्रत्येक घटकांचा सन्मान करता आला पाहिजे. निसर्गाशी जुळवून घेतले पाहिजे नाहीतर तुमच्याकडे कोट्यावधी रुपये असतील मात्र जगण्यासाठी हवा नसेल, पाणी नसेल. बरे झाले जुने माणसे शहाणे होती. त्यांनी झाडे लावून ठेवली आपण मात्र फोटोसाठी सेल्फीसाठी झाडे लावतो. माणूस हुशार आहे असे आपण मानतो, मात्र ज्ञानेश्वरासारख्या अनेक संतानी अनेक ग्रंथ लिहिली तरीही माणूस सुधारला नाही अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
 
 
लग्नात मान मिळाला नाही म्हणून रुसणारे फुगणारे अनेक लोक पाहायला मिळतात.आपल्या बोलण्यात अमृताचे मोहळ असावे मात्र त्या उलट आज बोलण्यात द्वेष,मत्सर, मळमळ जाणवते. अनेक निरर्थक गोष्टींनी माणूस दुःखाला जवळ करतो आणि जीवनाचा बेरंग करून घेतो. तेव्हा समजून ऊमजून जगा आणि जगण्यात आनंद निर्माण करा! असे नम्र आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी गो ग्रीन फाउंडेशन व डोणगावकर हॉस्पिटल यांच्या सहभागाने पाण्याचा काटकसरीने वापराबद्दल जनजागृती करणार्‍या पोस्टरचे अनावरण प्रा. गणेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष बंड यांनी केले तर समारोपिय आभार डॉ. रवी ठाकरे यांनी केले. डॉ. सुशील देशपांडे यांनी शारदा स्तवन म्हटले कार्यक्रमाकरिता श्रोत्यांची प्रचंड गर्दी होती.