मुंबई
ola-and-uber राज्यातील ॲप आधारित प्रवासी वाहतूक सेवा अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी ओला, उबेर, रॅपिडो सारख्या ॲग्रीगेटर कंपन्यांच्या कामकाजावर तांत्रिक देखरेख ठेवणारी अत्याधुनिक डिजिटल यंत्रणा उभारण्यात येणार आहे. या यंत्रणेद्वारे वाहनांची नोंदणी, चालकांची माहिती, कामाचे तास, पोलिस पडताळणी, परवाने आणि पार्किंग व्यवस्थेचा तपशील एकाच व्यासपीठावर उपलब्ध होईल.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने या माहितीचे विश्लेषण करून नियमांचे पालन होत आहे की नाही, यावर प्रभावी नियंत्रण ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. महाराष्ट्र ॲग्रीगेटर नियमावली-२०२६ संदर्भात वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ॲप आधारित प्रवासी वाहतूक क्षेत्रातील विविध प्रश्नांचा आढावा घेतला. ॲग्रीगेटर कंपन्यांच्या वाहनांची वाढती संख्या, स्वतंत्र टॅक्सीचालकांच्या समस्या, प्रवाशांची सुरक्षितता आणि प्रवास वाटपातील पारदर्शकता या मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
ॲग्रीगेटर कंपन्यांच्या प्रत्येक वाहनाची नोंदणी, वाहन चालविणाऱ्या चालकाचा परवाना, पोलिस पडताळणी आणि अन्य आवश्यक कागदपत्रांचा तपशील डिजिटल स्वरूपात उपलब्ध असणे आवश्यक आहे. एका वाहनावर वेगवेगळ्या पाळ्यांमध्ये कोणते चालक काम करतात, त्यांच्या कामाचे तास किती आहेत आणि वाहन कुठे उभे केले जाते, याचीही अद्ययावत नोंद ठेवावी. एखादी दुर्घटना किंवा अनुचित घटना घडल्यास संबंधित वाहन आणि चालकाची माहिती तातडीने मिळेल, अशी सक्षम यंत्रणा विकसित करण्याची सूचना फडणवीस यांनी केली.
प्रवास वाटपातील भेदभाव रोखणार
ॲपवरून प्रवासाचे वाटप करताना स्वतंत्र टॅक्सीचालक आणि मोठ्या वाहनताफ्यांच्या कंपन्यांना समान संधी मिळते की नाही, याची तपासणी करण्यावरही सरकार भर देणार आहे. कोणत्या वाहनाला, कोणत्या कारणाने आणि कोणत्या निकषांनुसार प्रवास दिला जातो, हे समजण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या अल्गोरिदमचे परीक्षण करता आले पाहिजे. प्रवास वाटपात भेदभाव होत असल्यास तो ओळखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.