श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम!

    दिनांक :30-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली,
shreyas-iyer भारतीय टी-२० संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वाखाली संघाला आणखी एका पराभवाचा सामना करावा लागला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिले तीन सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाला चौथ्या सामन्यात ८७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे श्रेयस अय्यरच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. भारतीय कर्णधार म्हणून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने गमावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याने सूर्यकुमार यादवला मागे टाकले आहे.
 
shreyas-iyer
 
ऑकलंड येथे झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर श्रेयस अय्यरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, न्यूझीलंडच्या फलंदाजांनी आक्रमक खेळ करत २० षटकांत २६० धावांचे लक्ष्य भारतीय संघासमोर ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. संपूर्ण संघाला १७२ धावांपर्यंतच मजल मारता आली आणि भारताला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
 
या पराभवानंतर श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाच्या आकडेवारीत आणखी एका पराभवाची भर पडली आहे. भारतीय संघाचे नेतृत्व करताना त्याला अवघ्या २३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नऊ वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे भारतीय कर्णधारांच्या सर्वाधिक पराभवांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, सूर्यकुमार यादवने ५० सामन्यांमध्ये नेतृत्व करताना केवळ आठ पराभव पत्करले होते.
 
भारतीय कर्णधारांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय पराभवांचा विचार करता, महेंद्रसिंह धोनी ७० सामन्यांत २८ पराभवांसह पहिल्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने ४८ सामन्यांत १६, तर रोहित शर्माने ६२ सामन्यांत १२ सामने गमावले आहेत. श्रेयस अय्यरच्या नावावर २३ सामन्यांत नऊ पराभव असून, सूर्यकुमार यादवने ५० सामन्यांत आठ पराभव स्वीकारले आहेत.
 
दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धचा ८७ धावांचा पराभव भारतीय संघासाठीही नकोसा ठरला आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांच्या फरकाने भारताचा हा दुसरा सर्वात मोठा पराभव आहे. यापूर्वी याच वर्षाच्या सुरुवातीला नॉटिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्ध भारताला १२५ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाने भारतीय संघाच्या नावावर आणखी एका नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.