अर्शदीपचा विक्रमांचा षटकार!

    दिनांक :30-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली,
arshdeeps-six-of-records भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत आपल्या नावावर नवा विक्रम नोंदवला आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १५० बळी घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेतील चौथ्या सामन्यात अर्शदीपने हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला.
 
arshdeeps-six-of-records
 
अर्शदीपने आपल्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर केवळ १५० बळींचा टप्पाच पूर्ण केला नाही, तर एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रमही आपल्या नावे केला आहे. यंदाच्या वर्षात त्याने आतापर्यंत ४० बळी घेतले आहेत. यासह त्याने आयर्लंडचा वेगवान गोलंदाज जोश लिटल याला मागे टाकले. लिटलने २०२२ मध्ये एका वर्षात ३९ बळी घेण्याची कामगिरी केली होती. या यादीत श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा २०२४ मध्ये घेतलेल्या ३८ बळींसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
 
१५० बळींचा टप्पा गाठण्यासाठी लागलेल्या दिवसांच्या बाबतीतही अर्शदीपने मोठा विक्रम केला आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर अवघ्या १,५७७ दिवसांत त्याने ही कामगिरी पूर्ण केली. यासह श्रीलंकेचा फिरकीपटू वानिंदू हसरंगाचा विक्रम त्याने मोडला. हसरंगाला १५० बळींचा टप्पा गाठण्यासाठी २,३२५ दिवस लागले होते.
 
दरम्यान, चेंडूंच्या संख्येचा विचार करता अर्शदीपने १५० बळी पूर्ण करण्यासाठी २,१४३ चेंडू घेतले. या कामगिरीसह तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूंमध्ये १५० बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. अफगाणिस्तानचा रशीद खान याने २,०९८, तर श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगाने २,०३५ चेंडूंमध्ये हा टप्पा गाठला आहे. अर्शदीप सिंगच्या या कामगिरीमुळे भारतीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर आणखी एका ऐतिहासिक विक्रमाची नोंद झाली आहे.