'माझ्याजवळ चुकीला माफी नाही...'

    दिनांक :30-Oct-2026
Total Views |
पराग मगर
नागपूर :
bishwanath-chatterjee गाण्यांचे शब्द, गीतकार, संगीतकार आणि गायक यांची माहिती संकलित करण्याचा छंद कधी जडला, हे मलाही कळले नाही. गीतशब्दकोश तयार करताना प्रचंड परिश्रम घेतले. लोकांना माहिती देताना त्यात एकही चूक होता कामा नये, हा माझा कटाक्ष होता. मी हे काम कधीही मानसन्मानासाठी केले नाही, तो माझा स्वानंद होता. आयुष्यातील पहिलाच सन्मान स्वीकारताना मात्र मनस्वी आनंद होत आहे, अशी भावना ज्येष्ठ चित्रपट संगीत अभ्यासक बिश्वनाथ चॅटर्जी यांनी व्यक्त केली.
 
parag
भारतीय हिंदी चित्रपटगीतांची माहिती संकलित करून तिचे जतन करण्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या चॅटर्जी यांचा विदर्भ साहित्य संघ आणि राष्ट्रभाषा परिवार यांच्या संयुक्त वतीने गुरुवारी हृद्य सत्कार करण्यात आला. गाण्यांची कॅलिग्राफी केलेली शाल, ग्रामोफोनच्या तबकडीपासून तयार केलेले स्मृतिचिन्ह आणि गीतकार-संगीतकारांच्या मांदियाळीने सजलेले मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्यात त्यांच्या प्रदीर्घ साधनेचा, अभ्यासाचा आणि अचूकतेच्या आग्रहाचा सुरेल प्रवास उलगडण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना चॅटर्जी यांनी शालेय वयात ‘ना तुम हमें जानो’ या गाण्याच्या ओळींपासून सुरू झालेल्या प्रवासाच्या आठवणी जागवल्या. पंचम, ओ. पी. नय्यर, शंकर-जयकिशन, किशोर कुमार, सुधीर फडके, खय्याम, मदन मोहन, वसंत देसाई आणि गुलजार यांच्यावरील कोश तयार करताना आलेले अनुभवही त्यांनी कथन केले. गाण्यांचा इतिहास शोधताना संदर्भांची खातरजमा करण्यासाठी घेतलेले कष्ट आणि प्रत्येक नोंदीतील अचूकतेसाठी केलेली धडपड त्यांच्या कथनातून अधोरेखित झाली. चॅटर्जी यांच्या या कार्याचे महत्त्व आजही कायम आहे. यतिंद्र मिश्र यांच्यासह अनेक अभ्यासक गाण्यांविषयीची माहिती प्रकाशित करण्यापूर्वी त्यांच्याकडून तपासून घेतात. त्यांच्या अभ्यासाची विश्वासार्हता आणि संदर्भांच्या अचूकतेची ही पावतीच आहे.
सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वि. स. जोग होते. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी आणि राष्ट्रभाषा परिवाराचे सचिव सुरेशबाबू अग्रवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. गांधी यांनी ध्येयवादाने प्रेरित होऊन, प्रसिद्धी आणि मानसन्मानाची अपेक्षा न ठेवता कार्य करणाऱ्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचा हा गौरव असल्याचे सांगितले. हा केवळ सत्कार नसून कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. सुरेशबाबू अग्रवाल यांनीही मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. जोग यांनी चॅटर्जी यांचा गौरव म्हणजे जणू त्यांना डी. लिट. प्रदान करण्याचाच सोहळा असल्याचे मत व्यक्त केले. अजेय गंपावार यांनी प्रास्ताविक केले. मानपत्राचे वाचन प्रसिद्ध गायिका भाग्यश्री बारस्कर यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रभाषा परिवारच्या रंगकर्मींनी भारतीय संगीताचा सुरेल प्रवास कलात्मक पद्धतीने सादर केला.