नवी दिल्ली,
decision-in-neet-paperfoot-case-in-november वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणातील आरोप निश्चित करण्याबाबतचा आदेश गुरुवारी राऊस अव्हेन्यू न्यायालयाने राखून ठेवला. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या प्रकरणात १४ जणांना आरोपी केले आहे. न्यायालय यावर १८ नोव्हेंबर रोजी आदेश देणार आहे. सीबीआयने जुलै महिन्यात १३ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर १४ वा आरोपी, शेषराव बजरंग सूर्यवंशी याच्याविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

न्यायालयाने ऑगस्ट महिन्यात मुख्य आरोपपत्राची दखल घेतली होती. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अजय गुप्ता यांनी सीबीआय आणि आरोपी सूर्यवंशी यांच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर, आरोप निश्चित करण्याबाबतचा आदेश राखून ठेवला. २ सप्टेंबर रोजी सूर्यवंशीच्या अटकेनंतर त्याच्याविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. आरोपी शेषराव याने सहआरोपी शुभम खैरनार याच्यासोबत गुन्हेगारी कट रचून परीक्षेपूर्वी काही उमेदवारांना परीक्षेतील कथित प्रश्न उपलब्ध करून दिले होते. त्या बदल्यात उमेदवारांकडून किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून पैसे वसूल केल्याचे आरोपपत्रात नमूद आहे.