अनिल कांबळे
नागपूर,
phallis house एमडी ड्रग्ज तस्करीप्रकरणी अटकेत असलेल्या विशाल ऊर्फ फल्ली पृथ्वीराज गुप्ता याच्या घरातून मिळालेली डायरी आता गुन्हे शाखेच्या तपासाचा महत्त्वाचा दुवा ठरण्याची शक्यता आहे. राजस्थानपासून मध्य प्रदेशमार्गे नागपूरपर्यंत पसरलेल्या कथित अमली पदार्थ तस्करीच्या जाळ्याचे आर्थिक व्यवहार, पुरवठा साखळी आणि साथीदारांची माहिती या डायरीतून मिळण्याची पोलिसांना अपेक्षा आहे. दरम्यान, फल्लीच्या घरातून सोन्याचे ब्रेसलेट, दोन अंगठ्या, कानातील दोन झुमके आणि सुमारे एक हजार रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. याच प्रकरणात कुणाल समुद्रे यालाही अटक करण्यात आली आहे.
हुडकेश्वर परिसरातील नरसाळा येथील इंद्रनगरमध्ये राहणाऱ्या फल्लीच्या घराची झडती घेताना पोलिसांना डायरी मिळाली. त्यातील नोंदींची तपासणी सुरू असून, त्यातून ड्रग्ज व्यवसायातील आर्थिक व्यवहार आणि अन्य संबंधित व्यक्तींची माहिती मिळू शकते. कोतवाली परिसरातील रहिवासी कुणाल समुद्रे याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. ड्रग्ज तस्करीतील त्याची भूमिका आणि अन्य आरोपींशी असलेले संबंध तपासले जात आहेत.
राजस्थानातून नागपूरपर्यंत जाळे?
बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका फ्लॅटवर छापा टाकून पोलिसांनी सुमारे १.४ किलो एमडी (मेफेड्रोन) पावडर जप्त केली होती. या प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, सुमारे १.५४ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती आहे. विशाल ऊर्फ फल्ली याला त्याच्या महिला मित्रासह तमिळनाडूतील रामेश्वरम येथून अटक करून नागपुरात आणण्यात आले.phallis house काँग्रेसचे नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या भांडेवाडी येथील घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणातही फल्ली टोळीतील सात आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे ड्रग्ज तस्करी आणि संघटित गुन्हेगारीतील संभाव्य संबंधांचाही तपास महत्त्वाचा ठरत आहे.
शेंगदाण्याच्या ठेल्यापासून तस्करीपर्यंतचा प्रवास
पोलिसांच्या सूत्रांनुसार, २५ वर्षीय विशालच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. वडिलांनी त्याला शेंगदाणे विकण्यासाठी ठेला लावून दिला होता. त्यावरून त्याला ‘फल्ली’ हे नाव पडल्याचे सांगितले जाते. पुढे तो कथितरीत्या अमली पदार्थांच्या व्यवसायात उतरला. सुरुवातीला ड्रग्ज पोहोचवणे आणि त्यात अन्य पदार्थ मिसळण्यासारख्या कामांसाठी त्याला दोन ते तीन हजार रुपये मिळत होते, असा पोलिसांचा संशय आहे. त्यानंतर त्याने बेरोजगार तरुणांना सोबत घेऊन पुरवठा साखळी उभी केल्याचा आरोप आहे. साथीदारांशी संपर्क ठेवण्यासाठी तो वारंवार मोबाईल हँडसेट आणि सिमकार्ड बदलत असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे.
महिला मित्राची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात
फल्लीची गर्लफ्रेंड सहेली ऊर्फ सोनू हिच्या भूमिकेचीही चौकशी सुरू आहे. ती कथितरीत्या आर्थिक व्यवहारांचा हिशेब ठेवत होती का, याचा तपास केला जात आहे. राजस्थानातून एमडी आणून त्याचे प्रमाण वाढविणे आणि नागपुरात विक्री करून मोठी कमाई करण्याच्या कथित योजनेचीही तपास यंत्रणा पडताळणी करीत आहे.