दिलजीतचा दिल्लीमध्ये म्युझिकल धमाका!

    दिनांक :30-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली,
diljits-musical-extravaganza-in-delhi पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ पुन्हा एकदा आपल्या संगीताचा जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. आज, ३० ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये त्याचा ‘रूपाय ऑरा इंडिया टूर २०२६’ अंतर्गत भव्य संगीत कार्यक्रम पार पडणार आहे. या कॉन्सर्टसाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असून, कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी वाहतुकीसंदर्भात विशेष सूचना जारी केल्या आहेत. विशेष म्हणजे, चाहत्यांची गैरसोय टाळण्यासाठी दिल्ली मेट्रोची सेवा मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती खुद्द दिलजीतने दिली आहे.

diljits-musical-extravaganza-in-delhi
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉन्सर्ट रात्री १० वाजेपर्यंत चालणार आहे. तसेच जवाहरलाल नेहरू स्टेडियम परिसरात वाहनांसाठी पार्किंगची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दिलजीतनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना मेट्रोने प्रवास करण्याचा सल्ला दिला आहे. काही मार्गांवर वाहतुकीचे निर्बंध असण्याची शक्यता असली, तरी मेट्रो सेवा मध्यरात्रीपर्यंत उपलब्ध राहणार आहे.
कॉन्सर्टमुळे दिल्लीतील अनेक प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे भीष्म पितामह मार्ग, लाला लाजपत राय मार्ग, चौथा आणि पाचवा ॲव्हेन्यू रोड, लोधी रोड, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी कॉलनीतील अंतर्गत रस्ते तसेच आर्चबिशप मकारिओस मार्ग या परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी प्रमुख चौकांमध्ये पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, दिलजीतच्या दिल्लीतील कार्यक्रमाला सुरुवातीला सुरक्षेच्या कारणांमुळे परवानगी मिळण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. यासंदर्भात पोलीस आणि आयोजकांमध्ये अनेक बैठका झाल्यानंतर अखेर कार्यक्रमाला हिरवा कंदील मिळाला. त्यामुळे आता हा बहुचर्चित संगीत कार्यक्रम पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दिल्लीपासून सुरू होणाऱ्या दिलजीतच्या ‘रूपाय ऑरा इंडिया टूर २०२६’मध्ये देशातील विविध शहरांचा समावेश आहे. दिल्लीतील कार्यक्रमानंतर १५ नोव्हेंबरला इंदूर, २१ नोव्हेंबरला अहमदाबाद, २७ नोव्हेंबरला मुंबई आणि २९ नोव्हेंबरला बंगळुरू येथे तो सादरीकरण करणार आहे. तर ५ डिसेंबर रोजी लखनौमध्ये त्याचा कार्यक्रम होणार आहे. ‘लव्हर’, ‘इक कुडी’ आणि ‘नैना’ यांसारख्या लोकप्रिय गाण्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या दिलजीतच्या या दौऱ्याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.