ई-कचऱ्यातून साकारले पर्यावरणपूरक नवोपक्रम

    दिनांक :30-Oct-2026
Total Views |
एमगिरीत ‘ई-वेस्ट टू इको-इनोव्हेशन’ प्रोटोटाईप स्पर्धा
 
 
वर्धा,
eco-friendly-innovations महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्था (एमगिरी) वर्धा व रेडिओ एमजीआयआरआय ९०.४ एफएम यांच्या संयुक्त वतीने स्वच्छता अभियान विशेष मोहीम ६.०-२०२६ अंतर्गत ‘ई-वेस्ट टू इको-इनोव्हेशन’ या अभिनव प्रोटोटाईप स्पर्धेचे आयोजन शुक्रवार, ३० ऑक्टोबरला करण्यात आले होते. स्पर्धेत सांदीपनी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून ई-कचऱ्याचा पुनर्वापर करून विविध नावीन्यपूर्ण प्रकल्प सादर केले.
 
 
eco-friendly-innovations
 
डिजिटल युगात इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यातून निर्माण होणाऱ्या ई-कचऱ्याची विल्हेवाट लावणे ही पर्यावरणासमोरील एक गंभीर समस्या बनली आहे. याच समस्येवर विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपाय शोधावे तसेच रिड्यूस, रिपेअर, रियूज आणि रिसायकल या संकल्पनांचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग व्हावा या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
 
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. कमलेश तिवारी, डॉ. संदीप जोशी, स्वानंद कळंबे तसेच राधिका लोखंडे उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांची पाहणी करून त्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले. ई-कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, त्याचा पुनर्वापर आणि त्यातून उपयुक्त वस्तूंची निर्मिती करण्याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
 
 
या स्पर्धेत सांदीपनी इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी एकांश वैद्य याने मॅग्नेटिक अलार्म, दर्शन जमाने याने व्हॅक्यूम क्लिनर, कुशल शेते याने ओव्हरफ्लो अलार्म, मधूर राऊत याने हायड्रॉलिक पॉवर प्लांट, रेयांश भोयर नेल आर्ट, रुद्र अंबाडकर अँटी-डस्ट क्लिनर, हर्ष राऊत याने फ्लोअर क्लिनर, हरीश घंगारे याने स्पीकर, नेहल गाडे व यश यांनी कूलर तर मोहित मन्ने याने नॅनो कार असे विविध प्रकल्प सादर केले. या सहभागाबद्दल अभिनव प्रबोधिनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अविनाश देव यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे कौतुक केले. मुख्याध्यापक सागर झाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले.