२१, १०, ५.३ आणि २.५ किलोमीटरच्या धावण्याच्या स्पर्धा
नागपूर,
sardar-patel-jayanti देशाचे पहिले गृहमंत्री आणि उपपंतप्रधान, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शनिवारी (ता. ३१ ऑक्टोबर) ‘युनिटी मॅरेथॉन रन’चे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्याची भावना दृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित ही मॅरेथॉन सकाळी ६ वाजता लकडगंज येथील सरदार वल्लभभाई पटेल मैदान (कच्छीविसा) येथून सुरू होणार आहे. या स्पर्धेत विविध वयोगटांतील धावपटूंसह शहरातील नागरिकांना सहभागी होता येणार आहे.
राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने आयोजित या मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होऊन राष्ट्रीय एकतेचा संदेश द्यावा, असे आवाहन महापौर निता ठाकरे यांनी केले आहे. धावण्याच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देतानाच राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्य अधिक दृढ करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
युनिटी मॅरेथॉनमध्ये २१ किलोमीटर खुला पुरुष गट, १० किलोमीटर खुला पुरुष व महिला गट, ५.३ किलोमीटर खुला महिला गट, ५.३ किलोमीटर १६ वर्षांखालील मुलांचा गट, २.५ किलोमीटर १६ वर्षांखालील मुलींचा गट आणि सर्व नागरिकांसाठी २.३ किलोमीटरची धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
११ लाखांची आकर्षक पारितोषिके
मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी एकूण ११ लाख रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. विविध गटांतील पहिल्या दहा क्रमांकांच्या धावपटूंना पदक, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच प्रथम पाच हजार धावपटूंना पदके आणि सर्व नोंदणीकृत सहभागी नागरिकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. वेशभूषा स्पर्धेतील सहभागींसाठीही आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
प्रमुख गटांतील पारितोषिकांचा तपशील :
२१ किलोमीटर खुला पुरुष गट
प्रथम १ लाख रुपये, द्वितीय ७० हजार रुपये, तृतीय ५० हजार रुपये, चौथा ४० हजार रुपये, पाचवा ३० हजार रुपये, सहावा २० हजार रुपये, तर सातव्या ते दहाव्या क्रमांकासाठी प्रत्येकी ११ हजार रुपये.
१० किलोमीटर खुला पुरुष व महिला गट : प्रथम ५१ हजार रुपये, द्वितीय ३१ हजार रुपये, तृतीय २१ हजार रुपये, चौथा १५ हजार रुपये, पाचवा ११ हजार रुपये, तर सहाव्या ते दहाव्या क्रमांकासाठी प्रत्येकी ५ हजार रुपये.
५.३ किलोमीटर खुला महिला गट : प्रथम २१ हजार रुपये, द्वितीय १५ हजार रुपये, तृतीय ११ हजार रुपये, चौथा ९ हजार रुपये, पाचवा ७ हजार रुपये, तर सहाव्या ते दहाव्या क्रमांकासाठी प्रत्येकी ५ हजार रुपये.
१६ वर्षांखालील मुलांचा ५.३ किलोमीटर गट : प्रथम १५ हजार रुपये, द्वितीय ११ हजार रुपये, तृतीय ९ हजार रुपये, चौथा ७ हजार रुपये, तर पाचव्या ते दहाव्या क्रमांकासाठी प्रत्येकी ५ हजार रुपये.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मॅरेथॉनला सुरुवात करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर निता ठाकरे राहणार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह लोकप्रतिनिधी, मनपा पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
सत्तापक्ष नेते तथा मॅरेथॉनचे संयोजक नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी नागरिकांना कुटुंबीय, मित्रमंडळी आणि विविध संस्था-संघटनांसह उत्स्फूर्त सहभाग नोंदवून मॅरेथॉन यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.
आज टी-शर्टचे वाटप
मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या धावपटू आणि नागरिकांना शुक्रवारी (ता. ३०) सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरदार वल्लभभाई पटेल कच्छीविसा मैदान, लकडगंज येथे टी-शर्टचे वाटप करण्यात येणार आहे. नोंदणीवेळी प्राप्त झालेल्या क्यूआर कोडच्या आधारे टी-शर्ट वितरित केले जातील. त्यामुळे सहभागी नागरिकांनी टी-शर्ट घेण्यासाठी येताना नोंदणीचा क्यूआर कोड सोबत ठेवावा, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.
मॅरेथॉनसाठी संकेतस्थळाच्या माध्यमातून नोंदणी करण्यात आली असून, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती उपायुक्त मंजेश खवले आणि क्रीडा अधिकारी डॉ. पियुष अंबुलकर यांनी दिली.