नाशिक,
Godavari flowed briskly before the Simhastha सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आगामी ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील गोदावरी नदीचे कोरडे पात्र आता पुन्हा प्रवाही आणि खळाळते झाले आहे. ३१ ऑक्टोबर रोजी नाशिक येथील पवित्र रामकुंड परिसरात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळ्याचा भव्य ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. नाशिकमधील रामकुंड तसेच त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ येथे शनिवारी दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी हा ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीनिमित्त रामकुंड परिसरात विविध प्रकारची विकासकामे वेगाने सुरू असल्याने गोदावरीचे पात्र काही काळासाठी कोरडे ठेवण्यात आले होते.
या सोहळ्याची अधिकृत माहिती देताना कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, नाशिकमधील मुख्य कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे उपस्थित राहणार आहेत. तर दुसरीकडे, त्र्यंबकेश्वर येथील ध्वजारोहण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, इतर प्रमुख मंत्री आणि आखाड्यांच्या महंतांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. या महत्त्वपूर्ण सोहळ्याची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली असून प्रशासनाकडून सुरक्षेची तसेच भाविकांच्या सुविधेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदी प्रवाही करण्यासाठी रात्री १२.३० वाजता गंगापूर धरणातून ३०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणामधून पाणी सोडल्यामुळे गोदावरीचे पात्र पुन्हा पाण्याने भरले असून परिसराला नवचैतन्य लाभले आहे. ३१ ऑक्टोबरच्या ऐतिहासिक क्षणाची आणि कुंभमेळ्याच्या शुभारंभाची उत्सुकता आता नाशिकसह देशभरातील भाविकांमध्ये शिगेला पोहोचली आहे.