मातृत्त्वाची ‘परीक्षा’ भविष्याची

दूधपितं लेकरू आईच्या कुशीसाठी रडत होतं!

    दिनांक :30-Oct-2026
Total Views |
सतिश वखरे
हिंगणघाट,
hinganghat एका बाजूला भविष्याची उत्तरपत्रिका लिहिणारी आई आणि दुसर्या बाजूला आईच्या मायेच्या स्पर्शासाठी व्याकूळ झालेलं अवघ्या तीन महिन्यांचं चिमुकलं बाळ... तीन तासांच्या या परीक्षेत आई प्रश्नांची उत्तरं शोधत होती. पण, बाहेर तिचं लेकरू आईच्या कुशीशिवाय प्रत्येक क्षण अस्वस्थ होत होतं. आजीची कुशी, महाविद्यालयातील महिला कर्मचार्यांची माया आणि सगळ्यांचे प्रेमळ प्रयत्नही त्या चिमुकल्याला आईच्या उबेची जागा देऊ शकले नाहीत. अखेर परीक्षेची घंटा वाजली आणि पेपर संपताच ती थकलेली माऊली आपल्या बाळाकडे धावली. तीन तासांची ताटातूट संपली... माय-लेकरांची ती भेट पाहून उपस्थितांच्याही डोळ्यांच्या कडा ओलावल्या. कारण आईच्या कुशीपेक्षा मोठं जग या चिमुकल्यासाठी दुसरं कोणतंच नव्हतं! काही वर्षांपूर्वी आई कुठे काय करते अशी मालिका दूरदर्शनवर सुरू होती... आई कुठेही असली तरी ती आईच असते... लेकराच्या भविष्यासाठी डोळ्यात आसवं साठवत तिनं एम.ए.चा आजचा पेपर दिला...
 
hinganghat
 
आईसाठी शब्द नसतातच! ती एक भावना आहे, तिच्या शिवाय राजा असो की रंक... तरुण असो की तान्हं लेकरू. भावना सर्वत्र एकच असते. ती म्हणजे तिच्या स्पर्शा शिवाय जीवन अपूर्णच! त्याचा प्रत्यय आज स्थानिक मातोश्री शिक्षण संस्थेच्या प्रांगणात आला. या शैक्षणिक संस्थेत एम.ए.च्या परीक्षेचे केंद्र आहे. याठिकाणी द्वितीय सत्र समाजशास्त्र परीक्षेचा आज पेपर होता. परीक्षार्थीनी कांचन बाबाराव नगराळे ही युवती या परीक्षेला बसलेली. तिला तीन महिन्याचे बाळ आहे. त्या बाळाला घेऊन उद्याचं भविष्य घडवण्यासाठी ती परीक्षा केंद्रावर पोहोचली. या तीन तासात तिची खरी परीक्षा होती. आयुष्याला नवीन वळण देण्यासाठी परीक्षाही आवश्यक होती आणि नऊ महिने पोटात वाढवलेल्या त्या लेकरालाही ती दूर सारू शकत नव्हती. परंतु, त्या लेकराच्या भविष्यासाठी परीक्षाही तेवढीच महत्त्वाची होती. त्या लेकराचा सांभाळ करण्यासाठी त्या माऊलीने सोबत आजीला आणलं होती.
 
 
हातात प्रश्न पत्रिका आणि उत्तर पत्रिका येण्यापूर्वी तिने लेकराला छातीशी लावले आणि डोळ्याच्या कडा ओल्याकरीतच ती परीक्षेसाठी हॉलमध्ये गेली. तीन तास आईच्या उबेशिवाय ते लेकरू आजीच्या कुशीत होतं. पण त्या छोट्याशा जीवाला आईची ऊब बरोबर कळते. ती अधामधात रडते. आजी तिला थोपटून शांत करते. या महाविद्यालयातील अन्य महिला कर्मचाराही थोडा थोडा वेळ घेऊन तिला आईच्या ममतेनेच सांभाळत होत्या. स्वतः संस्था अध्यक्ष व प्राचार्य डॉ. उमेश तुळसकर हे जातीने लक्ष ठेऊन होते. ते बाळ रडलं की म्हातार्या आजीची तारांबळ उडायची. आजी कौशल्य व पूर्वानुभाव लक्षात घेऊन तिला वेगवेगळ्या प्रेमळ मार्गाने शांत करीत होत्या. एकदाचा पेपर संपला. पेपरच्या तणावातून थकली भागली ती माऊली सर्वप्रथम हसत हसत बाळाकडे झेपावली. तीन तासापासून ताटातूट झाल्यानंतर माय - लेकराची भेट झाली अन त्या पिलालाही आईच्या पायाशीचं स्वर्ग असल्याची जाणीव झाली असावी.