नागपूरमधील पराभवाची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारतो : बावनकुळे

आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी आत्मचिंतनावर भर

    दिनांक :30-Oct-2026
Total Views |
नागपूर
bawankule नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या पराभवाची संपूर्ण जबाबदारी निवडणूक प्रभारी म्हणून मी स्वीकारतो. या निवडणुकीत पक्षाने विजयासाठी पूर्ण ताकद लावली होती. पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचून त्यांच्याशी संपर्क साधला. मात्र, अपेक्षित यश मिळू शकले नाही. निश्चितच काही ठिकाणी उणिवा राहिल्या आहेत. या उणिवा नेमक्या कुठे राहिल्या, पराभवाची कारणे काय आहेत, याचे आत्मचिंतन करून त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करू, असे स्पष्ट प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

bawankule 
 
नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाची जागा तशीही काँग्रेसकडे होती. शिवाय पुणे सुद्धा आमच्याकडे नव्हती. या दोन्ही जागा भारतीय जनता पक्षासाठी अतिशय प्रतिष्ठेच्या होत्या. या जागा आमच्याकडे नव्हत्या मात्र यावेळी त्या आमच्याकडे याव्यात या दृष्टीने आम्ही निवडणुकीची तयारी केली होती पण आम्ही हा पराभव स्वीकारला आहे.
नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मी स्वतः प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळत होतो. त्यामुळे नागपूरमधील पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी प्रयत्न केले नाहीत, असे म्हणता येणार नाही. सर्वांनी आपापल्या परीने मेहनत घेतली. परंतु, एवढे प्रयत्न करूनही विजय मिळाला नाही, याचा अर्थ काहीतरी कमी राहिले आहे. ती कमतरता नेमकी कुठे होती, याचा शोध घेणे आवश्यक आहे. प्रत्येक मतदारसंघातील मतदानाचा कल, मतदारांचा प्रतिसाद आणि निवडणुकीतील विविध घडामोडींचा अभ्यास करून पराभवाची कारणे समजून घेतली जातील, असे बावनकुळे यांनी सांगितले. काही गोष्टी शिकण्यासाठी आहेत. त्या आम्ही शिकणार आणि या चिंतनातून पुढच्या वेळेस आम्ही ही जागा जिंकू असेही त्यांनी स्पष्ट केले. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची जागा भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची होती. ही जागा जिंकण्यासाठी पक्षाने व्यापक नियोजन केले होते. निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच पक्ष संघटनेने या मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केले होते. पक्षाचे नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रत्येक पदवीधर मतदारापर्यंत पोहचले. निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी सर्वांनी मेहनत घेतली. या पराभवाचे आत्मचिंतन करून त्याची कारणे शोधू.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील निकाल हा पक्षासाठी आत्मपरीक्षण करण्याची संधी असल्याचे सांगत बावनकुळे म्हणाले की, निवडणुकीत विजय आणि पराभव होत असतात. मात्र, पराभवाची कारणे समजून न घेता पुढे जाणे योग्य नाही. संघटनेच्या कामकाजात कुठे सुधारणा करण्याची गरज आहे, मतदारांशी संपर्क वाढविण्यासाठी कोणते प्रयत्न करणे आवश्यक आहे आणि पदवीधर मतदारांच्या अपेक्षा काय आहेत, याचा अभ्यास केला जाईल. नागपूरच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत असतानाच, त्यामागील संघटनात्मक आणि निवडणूक प्रक्रियेतील कारणांचा सखोल आढावा घेऊन आगामी काळात अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार बावनकुळे यांनी व्यक्त केला.