मुंबई
jios-5g 2026: रिलायन्स जिओच्या 5G ग्राहकांची संख्या 30 कोटींवर पोहोचली आहे. जिओ प्लॅटफॉर्म्सच्या अनऑडिटेड तिमाही आर्थिक निकालांनुसार, गेल्या 12 महिन्यांत म्हणजेच 1 ऑक्टोबर 2025 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत जिओच्या 5G ग्राहकसंख्येत 6.6 कोटींची वाढ झाली आहे. कंपनीने फिक्स्ड ब्रॉडबँड क्षेत्रातही 3 कोटी ग्राहकांचा टप्पा पार केला आहे. जिओची एकूण ग्राहकसंख्या 54.2 कोटींवर पोहोचली आहे.
जिओच्या नेटवर्कवरील डेटा वापरातही वेगाने वाढ होत आहे. प्रत्येक ग्राहकाचा दरमहा सरासरी डेटा वापर 44.2 GB वर पोहोचला आहे. कंपनीच्या एकूण वायरलेस डेटा ट्रॅफिकमध्ये 5G चा वाटा आता सुमारे 56 टक्के झाला आहे. सप्टेंबर तिमाहीत जिओचा एकूण डेटा ट्रॅफिक वार्षिक तुलनेत 22.1 टक्क्यांनी वाढून 71 एक्साबाइटवर पोहोचला. जिओच्या नेटवर्कवर डेटाचा वापर सातत्याने वाढत असल्याचे हे आकडे दर्शवतात.
फिक्स्ड ब्रॉडबँड क्षेत्रातील जिओ एअरफायबरचे योगदानही सातत्याने वाढत आहे. एअरफायबर ग्राहकांची संख्या 1.51 कोटींवर पोहोचली आहे. गेल्या वर्षभरात जिओच्या फिक्स्ड ब्रॉडबँड ग्राहकसंख्येत झालेल्या एकूण निव्वळ वाढीमध्ये एअरफायबरचा वाटा 75 टक्क्यांहून अधिक राहिला आहे. या कालावधीत जिओच्या एकूण ग्राहकसंख्येत 3.6 कोटींची निव्वळ भर पडली, तर केवळ सप्टेंबर तिमाहीत 91 लाख नवीन ग्राहक जोडले गेले.
ग्राहकसंख्येतील वाढ आणि डिजिटल सेवांच्या विस्ताराचे प्रतिबिंब कंपनीच्या आर्थिक कामगिरीतही दिसून आले आहे. जिओ प्लॅटफॉर्म्सचा तिमाही एकूण महसूल 11.3 टक्क्यांनी वाढून 47,485 कोटी रुपये, तर EBITDA 16.6 टक्क्यांनी वाढून 21,879 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. प्रत्येक ग्राहकापासून मिळणारे दरमहा सरासरी उत्पन्न (ARPU) देखील वाढून 218.8 रुपयांवर पोहोचले आहे.
यापूर्वी 28 ऑक्टोबर रोजी जिओ प्लॅटफॉर्म्सने शेअर बाजारात दणदणीत पदार्पण केले होते. कंपनीचा 30,188 कोटी रुपयांचा IPO हा भारतीय इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO ठरला. या IPO ला 22 पटांहून अधिक प्रतिसाद मिळाला. शेअर बाजारातील सूचिबद्धतेनंतर बाजारमूल्याच्या दृष्टीने जिओ प्लॅटफॉर्म्स देशातील दुसरी सर्वात मूल्यवान सूचिबद्ध कंपनी ठरली आहे.