नवी दिल्ली,
junk food लहान मुलांच्या आहारात चिप्स, बिस्किटे, बर्गर, फ्रेंच फ्राईज आणि कुकीज यांसारख्या पदार्थांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. चविष्ट आणि सहज उपलब्ध असल्याने मुले अशा पदार्थांकडे आकर्षित होतात. मात्र, या सवयीचे परिणाम केवळ वजन वाढण्यापुरते मर्यादित नसल्याचे एका नव्या संशोधनातून समोर आले आहे. अति-प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांमुळे मुलांच्या मेंदूतील अन्नाबद्दलची प्रतिक्रिया बदलू शकते आणि त्याचा परिणाम त्यांच्या खाण्याच्या सवयींवर होण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पालकांनी मुलांच्या आहाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
'जामा नेटवर्क ओपन' या वैद्यकीय नियतकालिकात प्रकाशित झालेल्या अभ्यासात सुरुवातीला निरोगी वजन असलेल्या ४६ मुलांचा समावेश करण्यात आला होता. या संशोधनात मुलांच्या आहाराच्या सवयी आणि विशिष्ट खाद्यपदार्थ पाहिल्यानंतर त्यांच्या मेंदूमध्ये होणाऱ्या प्रतिक्रियांचा अभ्यास करण्यात आला. ज्या मुलांच्या रोजच्या आहारात अति-प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे प्रमाण अधिक होते, त्यांच्या मेंदूतील बक्षीस, प्रेरणा आणि सवयींशी संबंधित भाग कुकीज आणि फ्रेंच फ्राईजसारखे पदार्थ पाहिल्यानंतर अधिक सक्रिय झाल्याचे आढळले. या मेंदूच्या प्रतिक्रियांचा पुढील वर्षभरातील शारीरिक बदलांशीही संबंध दिसून आला. अशा मुलांच्या बीएमआयमध्ये, शरीरातील चरबीमध्ये आणि कमरेच्या घेरात तुलनेने अधिक वाढ झाल्याचे संशोधनात नोंदवण्यात आले.
या अभ्यासामुळे जंक फूड आणि बालपणातील लठ्ठपणा यांच्यातील संबंधांकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन समोर आला आहे. मात्र, अति-प्रक्रिया केलेले पदार्थ थेट मेंदूमध्ये बदल घडवतात किंवा मुलांना अशा पदार्थांचे व्यसन लागते, असा निष्कर्ष या संशोधनातून काढता येत नाही. विशेष म्हणजे, या परिणामांसाठी केवळ साखरच कारणीभूत नसल्याचेही संशोधकांनी स्पष्ट केले आहे. अनेक पदार्थांमध्ये चरबी आणि कर्बोदकांचे विशिष्ट मिश्रण असते.junk food त्यामुळे मेंदूतील बक्षीस आणि प्रेरणेशी संबंधित प्रक्रिया अधिक सक्रिय होऊ शकतात. अतिरिक्त साखरेचा विचार केल्यानंतरही या संबंधामागे इतर घटक असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे मुलांच्या आहारात फळे, भाज्या आणि घरगुती पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे, तसेच अति-प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवणे महत्त्वाचे ठरते.