veg-dum-biryani-at-home बिर्याणी म्हटले की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. विशेषतः मसालेदार आणि सुगंधी व्हेज दम बिर्याणी खाण्याची मजा काही औरच असते. मात्र, ही चव चाखण्यासाठी आता रेस्टॉरंटमध्ये जाण्याची गरज नाही. काही मोजके साहित्य आणि योग्य पद्धतीचा वापर करून तुम्ही घरच्या घरीही रेस्टॉरंटच्या चवीची व्हेज दम बिर्याणी तयार करू शकता. चला तर जाणून घेऊया, ही स्वादिष्ट बिर्याणी बनवण्याची सोपी पद्धत.
बिर्याणीसाठी लागणारे साहित्य
ही बिर्याणी तयार करण्यासाठी बासमती तांदूळ, सहा मध्यम आकाराचे कांदे, २० ते २५ लसूण पाकळ्या, दोन इंच आले, तीन ते चार हिरव्या मिरच्या, एक टोमॅटो, ताजी कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने लागतील. याशिवाय दोन गाजर, फरसबी, अर्धी फुलकोबी, दोन मध्यम आकाराचे बटाटे आणि अर्धा कप हिरवे वाटाणे घ्यावेत.
मसाल्यासाठी तीन ते चार मोठे चमचे तेल, अर्धा चमचा हळद, एक मोठा चमचा काळी मिरी पूड, एक चमचा लाल तिखट, दोन चमचे धणे पूड, दीड चमचा बिर्याणी मसाला, २०० ग्रॅम दही आणि चवीनुसार मीठ घ्यावे. तसेच आवश्यकतेनुसार गरम पाणी, तूप, कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने तयार ठेवावीत.
अशी तयार करा चविष्ट व्हेज दम बिर्याणी
सर्वप्रथम बासमती तांदूळ स्वच्छ धुऊन साधारण ३० ते ४५ मिनिटे पाण्यात भिजत ठेवावेत. त्यानंतर तांदूळ शिजवून घ्यावेत. दुसरीकडे कांदा, आले, लसूण, हिरव्या मिरच्या, टोमॅटो, कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरून घ्यावा. गाजर, फरसबी, फुलकोबी आणि इतर भाज्यांचे मध्यम आकाराचे तुकडे करावेत. बटाट्याचे तुकडे मात्र तुलनेने थोडे मोठे ठेवावेत.
आता बिर्याणीचा मसालेदार बेस तयार करण्यासाठी जाड बुडाचे आणि रुंद भांडे घ्यावे. त्यात तेल गरम करून चिरलेला कांदा घालावा. कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यावा. त्यानंतर आले, लसूण आणि हिरव्या मिरच्या घालून दोन ते तीन मिनिटे परतावे. पुढे हळद, काळी मिरी पूड, लाल तिखट, धणे पूड आणि बिर्याणी मसाला घालून मिश्रण एकजीव करावे.
यानंतर चिरलेला टोमॅटो, फेटलेले दही आणि मीठ घालावे. सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून मसाला शिजवावा. मिश्रणातील तेल वेगळे होऊ लागल्यानंतर त्यात बटाट्याचे तुकडे घालून काही मिनिटे शिजवावेत. बटाटे शिजल्यानंतर उर्वरित भाज्या आणि हिरवे वाटाणे घालावेत. आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकून ग्रेव्हीला योग्य घट्टपणा द्यावा.
भाज्यांचा मसाला तयार झाल्यानंतर त्यात शिजवलेला बासमती भात घालावा. त्यावर ताजी कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने पसरवावीत. त्यानंतर वितळलेले तूप भातावर सर्व बाजूंनी घालावे. भात आणि भाज्यांचे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून भांड्यावर झाकण ठेवावे.
शेवटी मंद आचेवर साधारण २० ते ३० मिनिटे बिर्याणी दमवर शिजू द्यावी. या प्रक्रियेमुळे भातामध्ये मसाल्यांचा सुगंध आणि भाज्यांची चव छान मुरते. ठरावीक वेळेनंतर झाकण काढून गरमागरम बिर्याणी वाढावी. अशा प्रकारे घरच्या घरी तयार झालेली मसालेदार व्हेज दम बिर्याणी कुटुंबीयांसोबत किंवा पाहुण्यांसाठी सर्व्ह करता येईल.