मुंबई,
mirzapur-makes-a-splash-on-ott बहुप्रतीक्षित ‘मिर्झापूर: द मुव्ही’ अखेर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटगृहांमध्ये सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता प्रेक्षकांना हा चित्रपट घरबसल्या पाहण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, ओटीटीवर हा चित्रपट विस्तारित आवृत्तीत म्हणजेच ‘एक्सटेंडेड कट’सह प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे चित्रपटगृहांमध्ये न दाखवलेली काही अतिरिक्त दृश्येही प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.
पंकज त्रिपाठी, अली फजल आणि दिव्येंदू शर्मा यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट प्राईम व्हिडिओवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध झाला आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट हिंदी भाषेत इंग्रजी सबटायटल्ससह पाहता येईल. मात्र, त्यासाठी प्राईम व्हिडिओचे सक्रिय सबस्क्रिप्शन असणे आवश्यक आहे. प्लॅटफॉर्मने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची माहिती दिली. ‘धमाका आला आहे. मिर्झापूर द मुव्ही आता प्राईम व्हिडिओवर पाहा,’ अशा शब्दांत प्रेक्षकांना ही माहिती देण्यात आली.
गुरमीत सिंग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मिर्झापूरच्या सत्तासिंहासनासाठी सुरू असलेला संघर्ष पुन्हा एकदा या चित्रपटातून पाहायला मिळतो. पंकज त्रिपाठी, अली फजल आणि दिव्येंदू यांच्यासह जितेंद्र कुमार, रवी किशन, अभिषेक बॅनर्जी, रसिका दुग्गल आणि मोहित मलिक यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. दरम्यान, ‘मिर्झापूर’ या लोकप्रिय वेब सीरिजचा पहिला सीझन २०१८ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्याला मिळालेल्या लोकप्रियतेनंतर २०२० मध्ये दुसरा, तर २०२४ मध्ये तिसरा सीझन प्रदर्शित करण्यात आला. या मालिकेच्या लोकप्रियतेमुळे चित्रपटाबाबतही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती.
बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने दमदार कमाई केल्याची नोंद आहे. ट्रेड ट्रॅकर सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी ३०.९० कोटी, दुसऱ्या दिवशी ३८.४० कोटी, तर तिसऱ्या दिवशी ४३.०५ कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या आठवड्यात चित्रपटाचे भारतीय बॉक्स ऑफिसवरील एकूण कलेक्शन १४८.४५ कोटी रुपयांवर पोहोचले. तर जगभरातील कमाईचा आकडा ३३९.८४ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.