बुलढाणा
mla-gaikwad शेतकरी आत्महत्यांवरून केलेल्या कथित वादग्रस्त विधानावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापल्याने बुलढाणा शिवसेना शिंदे गटाचे आ. संजय गायकवाड अडचणीत सापडले आहे. त्यांची या वक्तव्यावरून चौफेर कोंडी झाली आहे.
पक्षाचे प्रवक्ते आनंद पराजंपे यांनी आ. संजय गायकवाड यांच्या वक्तव्याशी शिवसेना सहमत नसल्याचे तसेच कुठल्याही लोकप्रतिनिधीनी असे संवेदनशील वक्तव्य करू नये संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्त्याचा निषेध करावा तेवढा कमी नाही पक्षाच्या पदाधिकार्यांनी सुद्धा वक्तव्य करतांना काळजी घ्यावी असे प्रसिद्धी माध्यमांना सांगितले आहे. तसेच शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी सुद्धा शिवसेना शेतकर्यांच्या मागे खंबीरपणे उभी आहे. आ. संजय गायकवाड यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्या नंतर या वक्तव्यासंदर्भात आ. संजय गायकवाड यांनी अखेर नमती भूमिका घेतली आहे.
माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून ते चुकीच्या पद्धतीने पसरवले गेले. मी शेतकर्यांच्या आत्महत्येबद्दल बोललोच नव्हतो, तर नशेच्या व आंमली पदार्थाच्या आहारी जाऊन आणि प्रेमभंगामुळे स्वतःचे आयुष्य संपवणार्या तरुणांच्या आत्महत्येबाबत मी उद्विग्नतेने बोललो होतो. तरीही माझ्या शब्दांमुळे महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांचे आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे मन दुखावले असेल, तर मी अत्यंत विनम्रपणे दिलगिरी व्यक्त करतो, असा खुलासा आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे.
दरम्यान, पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी तुमच्या संभाव्य निलंबनाचा प्रस्ताव ठेवला आहे का आणि तुमच्यावर कठोर कारवाई होणार का, असा थेट सवाल पत्रकारांनी विचारला असता गायकवाड यांनी त्यावर केवळ नो कॉमेंट्स म्हणत अधिक भाष्य करणे पूर्णपणे टाळले.
शेतकर्यांसाठी स्वतःचे प्लॉट विकले, मी स्वतःची शेतकरी पार्श्वभूमी सांगत गायकवाड यांनी आपल्या कामांचा पाढा वाचला. गेल्या ४० ते ४२ वर्षांपासून मी शेतकरी म्हणून आणि शिवसेनेच्या माध्यमातून शेतकर्यांसाठी सातत्याने संघर्ष करत आहे. माझे वडील लोकांच्या शेतात मजुरी करायचे, त्यामुळे शेतकर्यांचे दुःख मी जवळून पाहिले आहे. शेतकर्यांविषयी माझ्या मनात प्रचंड आदर आणि संवेदनशीलता आहे. दुष्काळात शेतकर्यांना मदत करण्यासाठी मी माझे स्वतःचे वैयक्तिक प्लॉट विकले आहेत. कोणाचे शेत जळाले तर त्याला आर्थिक मदत केली, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना ६-६ महिने पुरेल इतका किराणा भरून दिला आणि तब्बल ५५ शेतकर्यांना स्वतः पक्की घरे बांधून दिली आहेत. त्यामुळे मी अन्नदात्याच्या विरोधात बोलेन, हा विचारही मनात येऊ शकत नाही. मी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करून हात जोडून माफी मागतो. माझ्या कुटुंबातील एका तरुणाने आत्महत्या केली. आजकालची तरुण पिढी गांजा, चरस अशा विविध प्रकारच्या नशेत बेभान होते किंवा प्रेमभंगाच्या नैराश्यातून आई-वडील, पत्नी आणि लहान मुलांचा विचार न करता जीवन संपवते. अशा वेळी त्या कुटुंबाची जी भयावह अवस्था होते त्या संतापातून आणि काळजीपोटी मी तरुणांना उद्देशून बोललो होतो. असे आ. संजय गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे