आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज
पोलिस -आंदोलकांमध्ये झटापट
वाशीम,
mla-nitin-deshmukh अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्यांना किमान एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, या मागणीसाठी ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेत समृद्धी महामार्ग रोखला. वाशीम जिल्ह्यातील वनोजा येथे झालेल्या या आंदोलनाला हिंसक वळण लागले. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये जोरदार धक्काबुक्की व झटापट झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. त्यानंतर ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतकर्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक नष्ट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत शासनाकडून जाहीर करण्यात येणारी पाच हजार रुपयांची मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. नुकसानग्रस्त शेतकर्यांना किमान एक लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. वाशीम जिल्ह्यातील वनोजा परिसरात ठाकरे गटाच्या वतीने समृद्धी महामार्गावर आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र, त्यानंतरही आमदार नितीन देशमुख आणि त्यांच्या समर्थकांनी महामार्गावर उतरून वाहतूक रोखली. त्यामुळे महामार्गावरील परिस्थिती तणावपूर्ण बनली.
आंदोलकांना महामार्गावरून हटविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की व जोरदार झटापट झाली. परिस्थिती अधिक चिघळू नये आणि जमावाला पांगवता यावे, यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. या कारवाईनंतर पोलिसांनी आमदार नितीन देशमुख यांच्यासह आंदोलनकर्त्यांवर कारवाई करत देशमुख यांना ताब्यात घेतले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली होती. वनोजा परिसरासह समृद्धी महामार्गावर तब्बल दीड हजार पोलिस कर्मचार्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शेतकर्यांच्या नुकसानभरपाईच्या प्रश्नावरून शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतल्याने वनोजा येथील आंदोलनाची वाशीम जिल्ह्यासह राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.