मोकामाचे आमदार अनंत सिंह पुन्हा तुरुंगात

दुलारचंद यादव हत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन रद्द

    दिनांक :30-Oct-2026
Total Views |
पाटणा,
mla anant singh मोकामाचे शक्तिशाली आमदार अनंत सिंह पुन्हा एकदा तुरुंगात परतणार असून, सर्वोच्च न्यायालयाने दुलारचंद यादव हत्या प्रकरणात त्यांना पाटणा उच्च न्यायालयाने मंजूर केलेला जामीन रद्द केला आहे. न्यायमूर्ती एम. एम. सुंदेश आणि पी. व्ही. वराले यांच्या खंडपीठाने अनंत सिंह यांना १ डिसेंबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. उच्च न्यायालयाने गुन्ह्याचे स्वरूप आणि अनंत सिंह यांचा गुन्हेगारी इतिहास विचारात न घेता दिलेला जामीन चुकीचा होता, असे नमूद करत सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली. यासोबतच न्यायालयाने दुलारचंद यादव हत्या प्रकरणाचा तपास चार महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेशही दिले आहेत. मृताचे नातू नीरज कुमार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा मोठा निर्णय दिला. यापूर्वी १९ मार्च २०२६ रोजी पाटणा उच्च न्यायालयाने अनंत सिंह यांना १५,००० रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता; मात्र याचिकाकर्त्याच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात अनंत सिंह यांनी त्यांच्यावरील ६७ गुन्हेगारी प्रकरणांची संपूर्ण माहिती लपवल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
 

mla anant singh 
 
हे संपूर्ण प्रकरण २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ३० ऑक्टोबर २०२५ रोजी मोकामा येथे झालेल्या दुलारचंद यादव यांच्या हत्येशी संबंधित आहे. दुलारचंद यादव हे राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) माजी नेते आणि जन सूरज पक्षाचे समर्थक होते. निवडणुकीदरम्यान जेडीयूच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेले अनंत सिंह आणि जन सूरज पक्षाचे उमेदवार पियुष प्रियदर्शी यांच्या प्रचार ताफ्यांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात यादव यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांच्या तपासानुसार आणि कुटुंबीयांच्या आरोपानुसार, दुलारचंद यादव यांच्यावर आधी गोळी झाडण्यात आली आणि नंतर एसयूव्ही गाडी त्यांच्या अंगावरून घालण्यात आली, ज्यामुळे हृदय व श्वसनक्रिया बंद पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात मुख्य आरोपी ठरवत अनंत सिंह यांना १ नोव्हेंबर २०२५ च्या रात्री त्यांच्या दोन भाच्यांसह अटक करण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीत असतानाही अनंत सिंह यांनी मोकामातून निवडणूक लढवून आरजेडीच्या उमेदवार वीणा देवी यांचा २८,२०६ मतांच्या फरकाने पराभव करत विजय मिळवला होता.
दुसरीकडे, राजकीय घडामोडींमध्ये जेडीयूने नुकतीच अनंत सिंह यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पाटणा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत जेडीयूचे उमेदवार नीरज कुमार यांच्या विरोधात जन सूरज-समर्थित उमेदवार अनुज सिंग यांना अनंत सिंह यांनी उघडपणे पाठिंबा दिला होता.mla anant singh या कारवाईनंतर पक्षाने बिहार विधानसभेच्या अध्यक्षांकडे संविधानाच्या दहाव्या अनुसूचीतील पक्षांतरबंदीच्या तरतुदींनुसार अनंत सिंह यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची अधिकृत मागणी केली आहे. अशातच आता सर्वोच्च न्यायालयाने जामीन रद्द करून १ डिसेंबर २०२६ पूर्वी आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिल्याने मोकामाचे आमदार अनंत सिंह यांच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे.