पतीच्या मृत्यूनंतर वर्षाभरातच आईसह मुलगा आणि मुलीची आत्महत्या

    दिनांक :30-Oct-2026
Total Views |
वडोदरा,
Mother, son, and daughter die by suicide गुजरातच्या वडोदरा येथील मांडवी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना समोर आली असून एकाच कुटुंबातील तिघांनी राहत्या घरात गळफास लावून जीवनयात्रा संपवली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घरात काम करणाऱ्या महिलेने नेहमीप्रमाणे दरवाजा वाजवला असता आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तिने एका ओळखीच्या व्यक्तीला कळवले, ज्यानंतर नातेवाईक आणि पोलिसांना पाचारण करण्यात आले. घराचा दरवाजा उघडला असता ४७ वर्षीय आरतीबेन सोनी, त्यांचा २४ वर्षीय मुलगा नीलकंठ आणि २२ वर्षीय मुलगी जेनी या तिघांचे मृतदेह ड्रॉइंग रूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. मृतदेहांमधून दुर्गंधी येत असल्याने ही घटना घडल्याची वेळ आणि मृतदेह सापडणे यामध्ये काही तासांचे अंतर असावे असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
 
 
 
 
ghj67879
 
जवळपास १ वर्षापूर्वी या कुटुंबाचे प्रमुख चेतनभाई सोनी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. चेतनभाई यांनी सुमारे १.५ (दीड) वर्षापूर्वी ओल्ड पादरा रोडवर भागीदारासोबत एक आयुर्वेदिक रुग्णालय सुरू केले होते. चेतनभाईंच्या मृत्यूनंतर रुग्णालयाची संपूर्ण जबाबदारी, दैनंदिन कामकाज आणि हिशोब आरतीबेन, नीलकंठ आणि जेनी हे तिघेच सांभाळत होते. रुग्णालयाच्या बिझनेस पार्टनरने दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या ३-४ दिवसांपूर्वीच रुग्णालयात १० नवीन व्हिजिटिंग डॉक्टरांना भरती करण्याबाबत चर्चा झाली होती आणि रुग्णालयाचे काम उत्तम सुरू होते. कुटुंबात कोणतेही आर्थिक वाद किंवा आपसात मतभेद असल्याचे भागीदाराला माहिती नव्हते. मुलगा नीलकंठ काही काळापूर्वीच कॅनडावरून परतला होता, तर मुलगी जेनीने नुकतेच आपले शिक्षण पूर्ण केले होते.
 
 
वडिलांच्या मृत्यूनंतर मुलगा कॅनडावरून परतणे, मुलीचे शिक्षण पूर्ण होणे आणि कौटुंबिक व्यवसाय सुरळीत सुरू असणे अशा परिस्थितीत या तिघांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याबद्दल गूढ कायम आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, तिघांचा मृत्यू गळफास लागल्यामुळेच झाला आहे; मात्र मृत्यूपूर्वी घरात नेमकं काय घडलं, तिघांचा मृत्यू नक्की कधी झाला आणि आत्महत्येमागचे अचूक कारण काय आहे, हे सर्व प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. वडोदरा पोलीस या प्रकरणाचा सर्व अंगांनी कसून तपास करत असून, पोस्टमार्टम रिपोर्ट आणि सखोल तपासाअंतीच या घटनेमागील खरे कारण स्पष्ट होऊ शकेल. वर्षभरापूर्वी कुटुंबप्रमुखाला गमावल्यानंतर आता उर्वरित तिन्ही सदस्यांनी जीवन संपवल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.