एमपीएससी पेपरफुट; नऊ परीक्षांची चौकशी करणार

तुकाराम मुंढे यांची माहिती

    दिनांक :30-Oct-2026
Total Views |
मुंबई,
mpsc-paper-leak महाराष्ट्र लोकसेवा आयोगा(एमपीएससी)मार्फत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणात नऊ परीक्षांची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती चाैकशी आयाेगाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी दिली़ तसेच यासंदर्भात ज्यांना माहिती द्यायची असेल किंवा तक्रार करायची असेल ते १६ नोव्हेंबरपर्यंत करू शकतात, असेही त्यांनी सांगितले.
 
 
Tukaram Mundhe
 
विद्यार्थ्यांसह विराेधकांनी एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेत गैरप्रकार घडत असल्याचे आरोप करण्यात आले आहे़ विद्यार्थ्यांनी रोहित पवार यांच्या नेतृत्वात आंदोलनही केले होते. पेपरफुटीच्या प्रकरणांची चौकशी आणि दोषींवर कारवाई केली जावी, या मागणीने जोर धरताच फडणवीस सरकारने एक आयोग नेमत या प्रकरणी चौकशी केली जाईल असे सांगितले होते. या चौकशी आयोगात तुकाराम मुंढेंचा समावेश आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले या समितीचे अध्यक्ष आहेत. या आयोगाचे कार्यालय दालन क्रमांक २०१ अन्न आणि औषध प्रशासन विभाग या ठिकाणी कार्यान्वित झाले आहे.
 
या परीक्षांचा समावेश
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नऊ परीक्षा घेतल्या होत्या. यात औषध निरीक्षक परीक्षा गट ब २०२५, महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा परीक्षा २०२५, महाराष्ट्र गट अराजपत्रित सेवा परीक्षा २०२६, महाराष्ट्र गट क सेवा २०२५, महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२६, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा २०२५, अन्न आणि औषध प्रशासन मुख्य परीक्षा २०२३ या परीक्षांचा समावेश आहे. आयाेग या परीक्षांची चौकशी करणार आहे़
 
माहिती देताना प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक
१६ नोव्हेंबरपर्यंत ज्यांना निवेदनं द्यायची आहेत ते देऊ शकतात. या प्रकरणाची सुनावणी ही जाहीरपणे होणार आहे. पारदर्शक चर्चा झाली पाहिजे या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच निवेदनं ही व्यक्तीशः किंवा संस्था, संघटनांतर्फे दिली जाऊ शकतात. त्यासाठी प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक आहे, असेही तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.