कॉटन मार्केटमध्ये टॉवर क्रेनचा अपघात; चार मजूर गंभीर जखमी

गीता मंदिरासमोरील म्हाडा कॉलनीच्या बांधकामस्थळी दुर्घटना

    दिनांक :30-Oct-2026
Total Views |
नागपूर,
nagpur-tower-crane-accidentशहरातील कॉटन मार्केट परिसरात शुक्रवारी सकाळी टॉवर क्रेनशी संबंधित भीषण अपघात घडला. गीता मंदिरासमोरील म्हाडा कॉलनीच्या निर्माणाधीन इमारतीच्या ठिकाणी सकाळी सुमारे १०.३० वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या अपघातात चार मजूर गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेमुळे बांधकामस्थळी एकच खळबळ उडाली असून परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
 

crane
 
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, म्हाडा कॉलनीच्या निर्माणाधीन प्रकल्पात टॉवर क्रेनच्या साहाय्याने काम सुरू होते. याचदरम्यान अचानक दुर्घटना घडली आणि चार मजूर त्याच्या विळख्यात सापडले. अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित कामगारांमध्ये घबराट पसरली. जखमी मजुरांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.
 
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य सुरू करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
 
या दुर्घटनेमुळे शहरातील बांधकाम प्रकल्पांवरील कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. टॉवर क्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता की कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष करण्यात आले, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित यंत्रणांकडून तपास केल्यानंतरच दुर्घटनेमागील वस्तुस्थिती समोर येणार आहे.