नवी दिल्ली,
naughty boy भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आज देशाच्या स्वदेशी नेव्हिगेशन प्रणालीला अधिक बळकटी देण्यासाठी महत्त्वाची मोहीम राबवणार आहे. भारताच्या पुढील पिढीतील नेव्हिगेशन उपग्रह NVS-03 चे प्रक्षेपण GSLV-F18 या रॉकेटच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या प्रक्षेपण तळावरून हे उड्डाण नियोजित आहे. विशेष म्हणजे, एकेकाळी वारंवार तांत्रिक अडचणींमुळे 'नॉटी बॉय' म्हणून ओळखले जाणारे GSLV रॉकेट आता इस्रोच्या विश्वासार्ह प्रक्षेपकांपैकी एक बनले आहे.

NVS-03 हा भारताच्या NavIC या स्वदेशी उपग्रहाधारित नेव्हिगेशन प्रणालीतील दुसऱ्या पिढीचा तिसरा उपग्रह आहे. NavIC म्हणजे 'Navigation with Indian Constellation'. भारत आणि भारतीय भूभागाच्या आसपासच्या सुमारे १,५०० किलोमीटर क्षेत्रात अचूक स्थान, दिशा आणि वेळेची माहिती उपलब्ध करून देणे हे या प्रणालीचे उद्दिष्ट आहे. १९९९ मधील कारगिल युद्धादरम्यान परदेशी नेव्हिगेशन प्रणालींवर अवलंबून राहण्याच्या मर्यादा भारताच्या लक्षात आल्या. त्यानंतर स्वतःची स्वतंत्र नेव्हिगेशन यंत्रणा विकसित करण्याची गरज अधोरेखित झाली. राष्ट्रीय सुरक्षा, लष्करी हालचाली, विमान वाहतूक, सागरी प्रवास आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी NavIC महत्त्वाची ठरणार आहे.
NVS-03 चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये वापरण्यात आलेले स्वदेशी अणुघड्याळ. उपग्रहाधारित नेव्हिगेशनमध्ये वेळेची अचूकता अत्यंत महत्त्वाची असते. वेळेतील सूक्ष्म फरकामुळेही स्थान निश्चित करण्यात मोठी चूक होऊ शकते. यापूर्वी काही उपग्रहांमध्ये वापरण्यात आलेल्या परदेशी रुबिडियम अणुघड्याळांमुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, NVS-03 मध्ये भारतीय तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या अणुघड्याळाचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय, या उपग्रहात L5 आणि S-बँड सिग्नलसोबतच L1 सिग्नलची सुविधाही आहे.naughty boy त्यामुळे स्मार्टफोन, स्मार्टवॉच आणि इतर नागरी नेव्हिगेशन उपकरणांमध्ये NavIC चा वापर अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. सुमारे ५० मीटर उंच आणि ४२० टन वजनाचे तीन टप्प्यांचे GSLV-F18 रॉकेट या उपग्रहाला भूस्थिर हस्तांतरण कक्षेत स्थापित करणार आहे. NavIC प्रणालीला पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवण्यासाठी किमान सात सक्रिय उपग्रहांची आवश्यकता आहे. त्यामुळे NVS-03 सोबतच आगामी NVS-04 आणि NVS-05 या उपग्रहांच्या मोहिमाही महत्त्वाच्या ठरणार आहेत. या प्रक्षेपणामुळे भारताच्या स्वदेशी अंतराळ आणि नेव्हिगेशन क्षमतेला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.