24 अनाथ विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून सविताताईंनी दिली दिवाळी भेट

पाच आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना नवीन कपडे, मिठाई वाटप, शिक्षण व भविष्यातील जबाबदारीही स्वीकारली

    दिनांक :30-Oct-2026
Total Views |
देवरी
orphaned students  दिवाळीच्या प्रकाशपर्वात मायेचा आणि माणुसकीचा दीप प्रज्वलित करीत जि.प.सदस्य तथा विश्वमांगल्य सभेच्या पूर्व विदर्भ जनप्रतिनिधी सहसंयोजिका सविता पुराम यांनी जिल्ह्यातील पाच आश्रमशाळांमधील 24 अनाथ विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून दिवाळीनिमित्त या विद्यार्थ्यांची शुक्रवारी 30 ऑक्टोबर रोजी भेट घेतली व त्यांना नवीन कपडे व मिठाई भेट देतानाच त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक भवितव्याची जबाबदारी घेण्याची घोषणा त्यांनी केली.
 
devari
 
 
जिल्ह्यातील बोरगाव बाजार, कडिकसा, जमाकुडो, पुराडा आणि बीजेपार येथील आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या 24 विद्यार्थ्यांचे आई-वडिलांचे छत्र हरवलेले आहे. तेव्हा या 24 अनाथ विद्यार्थ्यांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करण्याचा निर्णय घेत त्यांनी शुक्रवारी या विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नवीन कपडे आणि मिठाईची भेट देत विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद फुलविला. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना दिवाळीची भेट देण्यापुरते मर्यादित न राहता सविताताईंनी या 24 विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या शिक्षणापासून सामाजिक जडणघडणीपर्यंत आणि उज्ज्वल भविष्याच्या वाटचालीपर्यंत आपण सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. अनाथ विद्यार्थ्यांना केवळ भेटवस्तूच नव्हे, तर मायेचे छत्र आणि पालकत्वाचा आधार देणार्‍या या उपक्रमाने दिवाळीचा आनंद द्विगुणित केला.
आजपासून या मुलांसोबत एक नवीन नाते जोडले आहे. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक भविष्याच्या जडणघडणीत योगदान देणे आणि प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे माझे कर्तव्य आहे,
- सविता पुराम, जि.प. सदस्य तथा माजी जि.प. सभापती,गोंदिया