भारताविरुद्ध फिलिप्सचा नवा इतिहास!

    दिनांक :30-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली,
phillips-creates-new-history न्यूझीलंडचा आक्रमक फलंदाज ग्लेन फिलिप्स याने भारताविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत दमदार कामगिरी करत ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात फिलिप्सने झंझावाती शतक झळकावत भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला.

phillips-creates-new-history
ऑकलंडमधील ईडन पार्क येथे झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० षटकांत २५९ धावांची मोठी मजल मारली. या धावसंख्येत ग्लेन फिलिप्सचा मोठा वाटा होता. सुरुवातीला अवघ्या ३४ धावांवर न्यूझीलंडचे दोन फलंदाज बाद झाल्यानंतर फिलिप्सने एका बाजूने डाव सावरला आणि आक्रमक फलंदाजी करत धावांचा वेग कायम ठेवला. त्याने अवघ्या ४९ चेंडूंमध्ये १०७ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने सहा चौकार आणि १० षटकार लगावले. या शतकी खेळीसह फिलिप्सने वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होप याचा विक्रम मागे टाकला. भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेत होपने २६१ धावा केल्या होत्या. मात्र, फिलिप्सने या मालिकेत आतापर्यंत २७६ धावा करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ग्लेन फिलिप्स २७६ धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे. शाई होप २६१ धावांसह दुसऱ्या, इंग्लंडचा हॅरी ब्रूक २२९ धावांसह तिसऱ्या, वेस्ट इंडिजचा शेरफेन रदरफोर्ड २२१ धावांसह चौथ्या, तर निकोलस पूरन १८४ धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे.
या सामन्यात न्यूझीलंडने भारतावर ८७ धावांनी विजय मिळवला. फिलिप्सच्या शानदार शतकामुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, या पुरस्कारासह त्याने न्यूझीलंडचा माजी फलंदाज मार्टिन गुप्टिल याच्या विक्रमाचीही बरोबरी केली. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडकडून सर्वाधिक १० वेळा सामनावीर पुरस्कार मिळवण्याचा मान आता या दोघांच्या नावावर आहे.