लॉस एंजेलिस,
professor-x हॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते पॅट्रिक स्टीवर्ट यांच्या निधनाची बातमी समोर आली असून, त्यांच्या जाण्याने मनोरंजनविश्वात शोक व्यक्त केला जात आहे. ‘स्टार ट्रेक’ आणि ‘एक्स-मेन’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपट आणि मालिकांमधील भूमिकांमुळे ते जगभरात लोकप्रिय झाले होते. ‘एक्स-मेन’मधील प्रोफेसर चार्ल्स झेवियर अर्थात ‘प्रोफेसर एक्स’ या व्यक्तिरेखेने त्यांना विशेष ओळख मिळवून दिली होती. दिलेल्या माहितीनुसार, वयाच्या ८६ व्या वर्षी लॉस एंजेलिस येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

स्टीवर्ट यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून निवेदन प्रसिद्ध करत निधनाची माहिती दिल्याचे सांगण्यात आले आहे. अल्झायमर आणि लेवी बॉडी डिमेन्शिया या आजारांशी ते झुंज देत होते. पत्नी सनी यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी सनी आणि डॅनियल व सोफी ही दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर हॉलिवूडमधील कलाकार आणि चाहत्यांकडून श्रद्धांजली व्यक्त केली जात आहे. ‘एक्स-मेन’मध्ये वूल्व्हरिनची भूमिका साकारणाऱ्या ह्यू जॅकमननेही स्टीवर्ट यांच्यासोबतचे काही जुने फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्या. पॅट्रिक यांना अद्भुत मित्र आणि माणूस संबोधत त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्याचे जॅकमनने म्हटले आहे.
मार्व्हल स्टुडिओनेही निवेदन प्रसिद्ध करून त्यांना आदरांजली वाहिली. प्रोफेसर चार्ल्स झेवियर या व्यक्तिरेखेला पॅट्रिक यांनी बुद्धिमत्ता, शालीनता आणि माणुसकीची जोड दिली. ‘एक्स-मेन’, ‘लोगन’ आणि ‘ॲव्हेंजर्स: डूम्सडे’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी या व्यक्तिरेखेला वेगळी ओळख दिल्याचे स्टुडिओने नमूद केले आहे. १३ जुलै १९४० रोजी इंग्लंडमधील मिअरफिल्ड येथे जन्मलेल्या पॅट्रिक स्टीवर्ट यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीवरून केली. प्रतिष्ठित रॉयल शेक्सपियर कंपनीमध्ये त्यांनी काम केले. त्यानंतर ‘स्टार ट्रेक: द नेक्स्ट जनरेशन’ या मालिकेत कॅप्टन जीन-ल्यूक पिकार्डची भूमिका साकारत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता मिळवली.
‘एक्स-मेन’ चित्रपट मालिकेतील प्रोफेसर चार्ल्स झेवियर यांच्या भूमिकेमुळे त्यांची लोकप्रियता आणखी वाढली. अभिनय आणि नाट्यक्षेत्रातील योगदानाची दखल घेत २०१० मध्ये ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी त्यांना नाइटहूड पदवीने सन्मानित केले होते. दरम्यान, पॅट्रिक स्टीवर्ट आगामी ‘ॲव्हेंजर्स: डूम्सडे’ या चित्रपटातही दिसणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हा चित्रपट भारतात १८ डिसेंबर रोजी, तर अमेरिकेत त्याच्या एक दिवस आधी प्रदर्शित होणार आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची शाहरुख खानच्या ‘किंग’ चित्रपटाशी टक्कर होणार आहे. ‘किंग’ हा चित्रपट २४ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.