गोंदिया
paisewari महसूल विभागाकडून खरीप व रब्बी हंगामातील पिकांची पैसेवारी निश्चित केली जाते. त्याआधारे जमीन महसुलात तहकुबी, सवलत अथवा माफीबाबत निर्णय घेण्यास मदत होते. गोंदिया जिल्हा प्रशासनाने ३० ऑकटोबर रोजी खरीप हंगामाची सुधारीत पैसेवारी जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यातील ९१९ गावांची एकूण सुधारीत पैसेवारी ०.८१ पैसे नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकाही गावाची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी नसल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. तर ३६ गावांमध्ये पीक नसल्याने त्यांची पैसेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. उर्वरित ९१९ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक आहे.
जिल्हा प्रशासनाने जाहिर केलेल्या आणेवारीनुसार तालुकानिहाय आकडेवारी पाहता गोंदिया तालुक्यातील १५३ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक असून तालुक्याची पैसेवारी ०.८० पैसे आहे. तर गोरेगाव तालुक्यातील ९४ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक असून तालुक्याची पैसेवारी ०.८६ आहे. त्यात तिरोडा तालुक्यातील १२३ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक असून तालुक्याची पैसेवारी ०.६४ पैसे नोंदविण्यात आली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १४८ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक असून पैसेवारी ०.८४ पैसे आहे. देवरी तालुक्यातील ११२८ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक असून पैसेवारी ०.७७ आहे.
आमगाव तालुक्यातील सर्व ८३ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक असून पैसेवारी ०.८५ पैसे आहे. सालेकसा तालुक्यातील ८६ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक असून पैसेवारी ०.९० पैसे, तर सडक अर्जुनी तालुक्यातील १०४ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक असून पैसेवारी ०.८२ पैसे नोंदविण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने ही पैसेवारीची माहिती जिल्हाधिकारी मंदार पत्की यांच्या माध्यमातून विभागीय आयुक्तांकडे सादर केली आहे.