मालेगाव,
rashtriya-swayamsevak-sangh राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मालेगाव नगरच्या वतीने रविवार, १ नोव्हेंबर रोजी विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाचे आयोजन सायंकाळी ६ वाजता श्री गजानन महाराज मंदिर, सिद्धेश्वर कॉलनी, नगरपंचायतीच्या मागे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात शस्त्रपूजनासह विजयादशमीच्या उत्सवाचे माध्यमातून सामाजिक एकात्मता, शिस्त, संस्कार आणि राष्ट्रकार्याप्रती समर्पणाचा संदेश देण्यात येणार आहे.
मालेगाव येथे आयोजित या उत्सवाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. निलेशजी मारु उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख वक्ते म्हणून सुनीलजी जाधव (अकोला विभाग सहकार्यवाह ) हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी ४.३० वाजता जुन्या आयटीआय मैदान, शिवचौक येथून पथसंचलनाला प्रारंभ होणार आहे.शिस्तबद्ध संचलन, एकरूपता आणि सामूहिक संघटनशक्तीचे दर्शन घडविणार्या या पथसंचलनात स्वयंसेवकांनी पूर्ण गणवेशात व वेळेपूर्वी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परंपरेत विजयादशमी उत्सवाला विशेष महत्त्व असून, संघटनशक्ती, सामाजिक समरसता आणि राष्ट्रहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा या निमित्ताने स्वयंसेवकांना मिळते.
समाजातील प्रत्येक घटकाने राष्ट्रहिताला प्राधान्य देत सामाजिक बांधिलकी जपावी, समाजात एकोपा आणि परस्पर सहकार्याची भावना वृद्धिंगत व्हावी, तसेच राष्ट्राच्या सर्वांगीण उन्नतीसाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, हा या उत्सवामागील व्यापक विचार आहे. या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाला स्वयंसेवक, नागरिक, संघप्रेमी आणि इष्टमित्रांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. तसेच कार्यक्रम व पथसंचलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मालेगाव नगराच्या वतीने करण्यात आले आहे.