गोंदिया
self-reliant ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबविण्यात येणार्या उमेद अभियानामुळे गोरेगाव तालुक्यात महिला सक्षमीकरणाला नवी दिशा मिळाली आहे. बचतगटांच्या माध्यमातून मिळालेल्या बँक कर्जाचा योग्य विनियोग करीत तालुक्यातील सुमारे चार हजार महिलांनी स्वयंरोजगाराची वाट धरली आहे. तालुक्यातील ७३४ महिला बचतगटांना आतापर्यंत २९ कोटी ३८ लाख २३ हजार रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले असून, या आर्थिक पाठबळातून ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला चालना मिळाली आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या (उमेद) माध्यमातून गोरेगाव तालुक्यातील ५६ गावांमध्ये २ हजार २४५ महिला बचतगट कार्यरत आहेत. या बचतगटांशी २४ हजार ६०० हून अधिक महिला जोडल्या गेल्या आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी अभियानाच्या माध्यमातून विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर व्यवसाय उभारणीसाठी बँकांकडून कर्ज मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्यात आले. महिलांच्या बचतगटांनी निर्माण केलेला विश्वास आणि आर्थिक शिस्त लक्षात घेऊन बँकांनी ७३४ बचतगटांना २९ कोटी ३८ लाख २३ हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले. या रकमेतून महिलांनी शेळीपालन, कुक्कुटपालन तसेच शेतीपूरक आणि नगदी पिकांवर आधारित व्यवसाय सुरू केले आहेत. यातून सुमारे चार हजार महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे. विशेष म्हणजे, कर्जाच्या माध्यमातून व्यवसाय उभारणार्या महिला नियमितपणे बँकेचे हप्ते परतफेड करीत आहेत. व्यवसायातून मिळणार्या उत्पन्नामुळे कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागविण्यासोबतच मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन खर्चासाठीही हातभार लागत आहे. त्यामुळे महिलांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होत असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळ मिळत आहे.
आर्थिक निर्णयांत महिलांचा वाढता सहभाग...
पूर्वी छोट्या-मोठ्या आर्थिक गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहणार्या महिलांना उमेद अभियानामुळे आर्थिक स्वावलंबनाचा आधार मिळाला आहे. स्वतःचा व्यवसाय आणि उत्पन्नाचे साधन निर्माण झाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. आता त्या मुलांच्या शिक्षणापासून ते कौटुंबिक आर्थिक नियोजनापर्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात सक्रिय सहभाग नोंदवत आहेत.
ग्रामीण भागातील महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी शासनाकडून राबविण्यात येणारा हा स्तूत्य उपक्रम आहे. उमेद अंतर्गत बचत गटाच्या जास्तित जास्त महिलांनी या उपक्रमांतर्गत रोजगार उभारून वार्षीक १ लाख रुपये निव्वळ नफा मिळविण्यासाठी प्रयत्न करावे व आत्मनिर्भर व्हावे.
- लिलाधर लंजे, तालुका अभियान व्यवस्थापक, गोरेगाव