राजुरा
murder घरगुती वादातून मुलाने आपल्या वडिलाची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर विषारी औषध प्राशन करुन वडिलांनी आत्महत्या केल्याचा खोटा बनाव रचून पोलिसांची दिशाभूल केली. मात्र, मृतकाच्या अंतिम शवविच्छेदन अहवालावरुन दिड वर्षानंतर याप्रकरणी हत्येचा गुन्हा उघडकीस आला. पोलिसांनी आरोपी निखील शंकर काळे (31, रा. धिडसी, ता. राजुरा) याच्याविरूध्द खुनाचा व पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
20 मे 2025 रोजी राजुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चार्ली येथील शेतशिवारात शंकर परशुराम काळे (59) यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. मृतकाच्या मुलाने दिलेल्या प्राथमिक माहितीवरून, या प्रकरणी राजुरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र अहवालावरुन हा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाल्याचे निष्पण झाले. सुरुवातीला मृतकाचा मुलगा निखील काळे याने वडिलांनी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केली होती. पोलिसांनी आरोपी निखील काळे यांची परत सखोल चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
ही घटना 19 मे 2025 रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले. घरातील सोन्याचा गोफ चोरीला गेल्याचा संशय व्यक्त करीत आरोपीच्या आईने मृत वडील शंकर काळे यांच्यासमक्ष निखीलवर आरोप केला होता. यावरून पिता-पुत्रात जोरदार वाद होऊन आपापसात मारामारी झाली होती. वडिलांनी केलेल्या मारहाणीचा प्रचंड राग मनात धरून निखील रात्री 1 वाजताच्या सुमारास शेतात पोहोचला. तिथे झोपलेल्या वडिलांसोबत पुन्हा त्याचा वाद झाला आणि संतापाच्या भरात त्याने वडिलांना खाटेवर पाडून आपल्या दोन्ही हातांनी त्यांचा गळा दाबला. वडिलांचा मृत्यू झाल्यावर आरोपीने पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचे शव सुबाभळीच्या झाडाजवळील धुरावर नेऊन ठेवले. तसेच शेतात पडलेली तणनाशक औषधाची बॉटल आणून वडिलांच्या तोंडाला औषध लावले आणि लोकांची दिशाभूल करण्यासाठी बनाव रचला होता. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी निखील काळे याच्याविरुद्ध कलम 103 (1) आणि 240 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.