विजेचा सापळा रचून चितळाची शिकार

पाच जणांवर गुन्हा,, वन विभागाच्या विशेष पथकाची कारवाई

    दिनांक :30-Oct-2026
Total Views |
गोंदिया
deer-poached सालेकसा वनपरिक्षेत्रांतर्गत येणार्‍या बाकलसर्रा परिसरात विजेचा प्रवाह सोडून संरक्षित वन्यप्राणी चितळाची शिकार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वन विभागाच्या विशेष पथकाने २८ ऑक्टोबर रोजी गुप्त माहितीच्या आधारे मध्यरात्री धाड टाकून शिकारीचा हा प्रकार उघड केला. घटनास्थळावरून चितळाची ताजी कातडी, मांसाचे तुकडे आणि शिकारीसाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी पाच आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
salekasa
बाकलसर्रा जंगल परिसरात विजेच्या तारांचा सापळा रचून चितळाची शिकार करण्यात आल्याची गोपनीय माहिती वन विभागाला मिळाली. या अधारे वन अधिकार्‍यांनी विशेष पथक तयार करून संबंधित ठिकाणी धाड टाकली. यावेळी घटनास्थळी चितळाची ताजी कापलेली कातडी, मांसाचे तुकडे आणि विजेच्या तारांचे जाळे आढळून आले. पथकाने घटनास्थळाचा पंचनामा करून सर्व साहित्य जप्त केले. या प्रकरणी बाकलसर्रा येथील नरेंद्र श्रीराम चौडाये (२६), दिनेश भरतलाल मेश्राम (२६), राजू भागचंद उईके (३०), भरतलाल किसनलाल मेश्राम (६०) आणि कृष्णा बिसराम चौडाये (५५) यांच्याविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ मधील कलम ९, ३९, ४८, ५० व ५१ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेली कातडी व मांसाचे नमुने तपासणीसाठी पशुधन विकास अधिकारी आणि राज्य न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर या प्रकरणातील पुढील तपासाला दिशा मिळणार आहे.
यांनी केली कारवाई...
उपवनसंरक्षक पवनकुमार जोंग आणि सहायक वनसंरक्षक सचिन डोंगरवार यांच्या मार्गदर्शनाखाली सालेकसा वनपरिक्षेत्र अधिकारी अतुल वालके यांच्या नेतृत्वात क्षेत्र सहायक जे. जी. खान, चौव्हान, प्रदीप भंडारकर, किशोर फुंडे, विनोद भेंडारकर, पाऊलझगडे, सुलाखे, सुनील बारसे यांच्यासह वनरक्षक व वनकर्मचार्‍यांच्या पथकाने केली.