बोनी कपूर यांच्या हेअर ट्रान्सप्लांटचे गुपित उघड!

    दिनांक :30-Oct-2026
Total Views |
मुंबई,
boney-kapoors-hair-transplant-revealed निर्माते बोनी कपूर यांच्या नव्या लूकची गेल्या काही काळापासून मनोरंजनविश्वात चर्चा सुरू आहे. २०२४ मध्ये त्यांनी हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्त्वात झालेला बदल अनेकांच्या लक्षात आला होता. आता त्यांची मुलगी जान्हवी कपूर आणि मुलगा अर्जुन कपूर यांनी या बदलामागील एक मजेशीर किस्सा उघड केला आहे. करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या नवव्या सीझनमध्ये त्यांनी बोनी कपूर यांच्या हेअर ट्रान्सप्लांटबाबत केलेल्या खुलाशामुळे वरुण धवन आणि करण जोहर यांना हसू आवरता आले नाही.
 
boney-kapoor
 
या कार्यक्रमात जान्हवी कपूर आणि वरुण धवन सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत अर्जुन कपूरही उपस्थित होता. रॅपिड फायर राऊंडदरम्यान करण जोहरने जान्हवीला तिचे वडील बोनी कपूर यांच्याबाबत एखादी मजेशीर अफवा सांगण्यास सांगितले. त्यावर जान्हवीने बोनी कपूर यांनी ध्यानधारणेच्या माध्यमातून केस वाढवले, अशी गंमतीशीर अफवा पसरवण्याची कल्पना मांडली. यावर अर्जुन कपूरनेही मिश्किल टिप्पणी करत प्रत्यक्षात त्यांचा बदल पाहिल्यानंतर कोणाचाही विश्वास बसणार नाही, असे म्हटले.
 
यानंतर बोनी कपूर यांच्या हेअर ट्रान्सप्लांटमागील व्यावसायिक कराराचा विषय चर्चेत आला. जान्हवीने सांगितले की, बोनी कपूर यांना हेअर ट्रान्सप्लांट करून घेण्यासाठी पैसे खर्च करावे लागले नाहीत, उलट या प्रक्रियेसाठी त्यांना पैसे मिळाले होते. एका ब्रँडसोबतच्या सहकार्यामुळे हा व्यवहार झाल्याचे तिने स्पष्ट केले. हा खुलासा ऐकून करण जोहरलाही आश्चर्य वाटले.
 
जान्हवीने यावेळी आणखी एक मजेशीर माहिती दिली. बोनी कपूर यांच्या नव्या लूकच्या जाहिरातींसाठी आणखी पाच बॅनर तयार करण्यास तिने मंजुरी दिली असल्याचे सांगितले. या जाहिरातींमध्ये केस नसताना आरशात पाहून दुःखी असलेले आणि केस आल्यानंतर आनंदी दिसणारे बोनी कपूर असे चित्रण असणार असल्याचे तिने सांगितले. तिच्या या वक्तव्यावर वरुण धवन आणि करण जोहर जोरात हसू लागले. अर्जुन कपूरनेही या संभाषणात आपल्या खास विनोदी शैलीत रंगत आणली.
 
दरम्यान, याच कार्यक्रमात जान्हवी कपूरच्या लग्नाबाबतही चर्चा झाली. करण जोहरने तिला लग्नाच्या योजनांविषयी विचारले असता, पुढील दोन ते तीन वर्षांत लग्न करण्याचा कोणताही विचार नसल्याचे तिने स्पष्ट केले. त्यामुळे सध्या तरी अभिनेत्री लग्नासाठी घाई करणार नसल्याचे तिच्या उत्तरातून समोर आले. बोनी कपूर यांच्या हेअर ट्रान्सप्लांटचा किस्सा आणि जान्हवीच्या लग्नाबाबतच्या वक्तव्यामुळे हा कार्यक्रम चर्चेत आला आहे.