पोंभुर्णा
tiger-attack तालुक्यातील सातारा तुकूम परिसरात वाघाने एका गुराख्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवार, 30 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. राजेश्वर बिजा सिडाम (60) असे जखमी गुराख्याचे नाव असून, त्यांच्यावर चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राजेश्वर सिडाम हे नेहमीप्रमाणे गायीला चारण्यासाठी जंगलात गेले होते. यावेळी सातारा तुकूम येथील वनकक्ष क्रमांक 436 मध्ये वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात राजेश्वर सिडाम गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती कळताच वनविभागाचे कर्मचारी आणि गोंडवाना आंदोलन आदिवासी चळवळीचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी राजेश्वर सिडाम यांना तातडीने उपचारासाठी चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे.